लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कराड, वाळवा तालुक्यात आणि कृष्णा खोऱ्यातील ग्रामपंचायत निवडणुका पाहता पक्षीय विचार केला गेला नाही. बऱ्याच ठिकाणी अभद्र युती झाल्या. याच पद्धतीने कृष्णा कारखान्याच्या आगामी रणांगणात गाजणार आहे. वाळवे तालुक्यात राष्ट्रवादीचे सहा संचालक आहेत, हे भाजपचे डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. आगामी काळातही सहकारमधून विद्यमान संचालक इच्छुक आहेत.नवीन चेहऱ्यांनाही उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे.
कराड, वाळवा, कडेगाव तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची हवा तापू लागली आहे. मोहिते-भोसले यांच्यातील चुरशीचा सत्तासंघर्ष महाराष्ट्रातील जुन्या, जाणत्या सहकारी चळवळीतील नेत्यांना माहीत आहे. गेल्या दशकात संस्थापक पॅनलच्या रूपाने युवा शक्ती सरसावली आणि विजयी झाली. परंतु त्यांचा कारभारच अडचणीत आला. याचाच फायदा गत निवडणुकीत सहकार पॅनलचे डॉ. सुरेश भोसले यांना झाला आणि आता ते ‘कृष्णा’ची घडी बसवल्याचा दावा ते करीत आहेत.
आगामी काळात ‘कृष्णा’चे रणांगण गाजणार आहे. यामध्ये सत्तास्थानी डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांच्या रूपाने भाजपचा झेंडा ‘कृष्णा’वर फडकत असला तरी त्यांच्या बळकटीच्या दोऱ्या मात्र वाळवे तालुक्यातील जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक सत्ताधारी सहकार पॅनलमधील माजी उपाध्यक्ष, संचालक लिंबाजी पाटील (तंबावे), संजय पाटील (इस्लामपूर), दिलीप पाटील (नेर्ले), जयश्री पाटील (बहे), सुजित मोरे (रेठरे हरणाक्ष), अमोल गुरव (बहे) यांच्या हाती आहेत. आता आगामी निवडणुकीत सहकारमधून इच्छुकांची संख्या मोठी आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याने वाळवे तालुक्यात सहकार पॅनलचा किल्ला अभेद्य आहे.
फोटो - २१०१२०२१-आयएसएलएम-कृष्णा न्यूज (दोन सिंगल फोटो)
जयंत पाटील, डॉ. सुरेश भोसले