अर्जुन कर्पे ।कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात खासदार संजयकाका पाटील यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळाल्याने काका गटात ‘म्हैसाळ’चे पाणी उसळी मारू लागले आहे. या निवडीने काकांच्या कार्यकर्त्यांना तसेच पहिल्या फळीतील नेत्यांना बळ मिळाले आहे. मात्र राष्ट्रवादीच्या पोटात कळ मारू लागल्याचे चित्र आहे.माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात मंत्रीपद, महामंडळचे पद नव्हते. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने खा. पाटील यांना कृष्णा खोरेचे उपाध्यक्षपद देऊन, त्यांच्या स्वपक्षातील तसेच विरोधी पक्षातील हितचिंतकांना धक्का दिला आहे.\
तालुक्यात आजपर्यंत पक्षीय राजकारणाऐवजी गटा-तटाचे राजकारण उफाळून आले आहे. तालुक्यात राष्ट्रवादीत आबा गट व सगरे गट असे राजकारण आहे, तर माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा स्वतंत्र गट आहे. यामध्ये खा. पाटील यांनी गेल्या चार वर्षात कवठेमहांकाळ तालुक्यात स्वत:चा गट निर्माण केला आहे. हे गटा-तटाचे राजकारण आजवर ऐन निवडणुकीत उफाळून आलेले दिसून आले आहे.
खा. पाटील यांनी भाजपचे तालुक्याचे नेते चंद्रकांत हाक्के, माजी उपसभापती अनिल शिंदे, हायुम सावनूरकर, बाजार समितीचे सभापती दादासाहेब कोळेकर यांच्या तिफणीतून भाजपच्या कमळाचे बीज तालुक्याच्या शिवारात पेरण्याचा प्रयत्न केला आहे.