जयंतरावांनी घेतली भेट : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी रणनीती; मिरजेतील नेत्यांचा थंडा प्रतिसादसांगली : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी माजी महापौर इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी यांनी मिरज संघर्ष समितीतून लढण्याची तयारी चालविली आहे. नायकवडी व आवटी यांना पुन्हा राष्ट्रवादीत आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी या दोघांची भेट घेऊन चर्चाही केली. पालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी राष्ट्रवादीने नायकवडी व आवटींसमोर पायघड्या अंथरल्या असल्या तरी, त्यांनी अद्याप प्रतिसाद दिला नसल्याचे समजते. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सव्वा वर्षाचा कालावधी असला तरी, सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या चाचपणीला सुरूवात केली आहे. सत्ताधारी काँग्रेस व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने भविष्यातील भाजपचे आव्हान थोपविण्यासाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी आघाडीची घोषणा केली असली तरी, हा निर्णय मिरजेतील नगरसेवकांच्या पचनी पडलेला नाही. त्यातून काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत इद्रिस नायकवडी यांनी राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीला उघडपणे विरोध करीत, आम्हाला जमेत धरू नका, असे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर झालेल्या प्रभाग समिती सभापतींच्या निवडीत मिरजेतील प्रभाग चारमध्ये पक्षविरहित आघाडी करण्यात आली. त्याला ‘मिरज पॅटर्न’चे नाव देत, मर्जीतील नगरसेवकाला सभापतीपदी संधी देण्यात आली. नायकवडी, आवटी, मैनुद्दीन बागवान यांच्यासह मिरजेतील १२ ते १३ नगरसेवकांनी एकत्र येत मिरज संघर्ष समितीच्या नावाखाली स्वतंत्रपणे लढण्याचे संकेतही दिले होते. निवडणुकीसाठी राजकीय घडामोडीला वेग आला असतानाच, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी इद्रिस नायकवडी व सुरेश आवटी यांची मिरजेत भेट घेतली. नायकवडी यांच्या घरी झालेल्या भेटीत दोघांनाही राष्ट्रवादीत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. मिरजेतील हे दोन्ही गट राष्ट्रवादीत आल्यास महापालिकेवर झेंडा फडकविण्यात राष्ट्रवादीला यश येईल, असा कयास बांधला जात आहे. त्यादृष्टीने जयंत पाटील यांनी दोघांशीही चर्चा केली. राष्ट्रवादीची सूत्रे नायकवडींच्या हाती देण्याची तयारीही दर्शविल्याची चर्चा आहे. जयंत पाटील यांच्या प्रस्तावाबाबत नायकवडी व आवटी यांनी स्पष्टपणे कोणताच प्रतिसाद दिला नाही. पालिका निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा कालावधी आहे. त्यामुळे विचार करण्यासाठी वेळ द्या, असे सांगून त्यांनी जयंतरावांची बोळवण केली. नायकवडी, आवटी व जयंतरावांच्या भेटीची चर्चा मिरजेत जोरदारपणे सुरू आहे. त्यामुळे या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)भाजपचा पर्याय : अडचणीचा!मिरजेत किशोर जामदार, स्थायी समिती सभापती संगीता हारगे वगळता बारा ते तेरा नगरसेवकांनी इद्रिस नायकवडी, सुरेश आवटींच्या नेतृत्वाखाली एकत्र मोट बांधली आहे. सध्या तरी या गटाकडून मिरज संघर्ष समितीची नव्याने रचना करण्याचे काम सुरू आहे. पण त्यांच्यासमोर भाजपचाही पर्याय खुला आहे. पण या गटातील काही नगरसेवकांना भाजपचा पर्याय अडचणीचा ठरणार आहे. त्यात निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा कालावधी असल्याने, राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे.
नायकवडी, आवटींना राष्ट्रवादीच्या पायघड्या
By admin | Published: May 03, 2017 11:22 PM