नितीन काळेल ।सातारा : राजकीय धुरळा उडविणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून शरद पवार उतरणार असल्याने राजकीय गणितेही पूर्णपणे बदलणार आहेत. त्यामुळेच आता भाजपनेही तुल्यबळ उमेदवार देण्याचे जाहीर केले असून, मंत्री महादेव जानकर यांनीही शरद पवारांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गणितावरच विरोधकांचं समीकरण सुरू झाले आहे.
माढा लोकसभा मतदारंसघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. पहिलीच निवडणूक राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लढविली आणि जिंकलीही. तर २०१४ च्या मोदी लाटेत राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील कसेबसे निवडून आलेले. आताही या मतदारसंघातीलच चित्र सतत बदलत आहे. माढ्यामधून राष्ट्रवादीकडून इच्छुक असणारे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी तर पवारांच्या येण्याने जवळपास तलवारी म्यानच करून ठेवल्या आहेत. मात्र, यावेळी पुन्हा राष्ट्रवादीकडून शरद पवार मैदानात उतरणार असलेतरी त्यांचा मार्ग नक्कीच खडतर राहणार आहे.
कारण, २००९ मध्ये पवारांनी माढ्याचे नेतृत्व केले असलेतरी ती स्थिती आता नाही. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने घड्याळाची टिकटिक पुन्हा चालू ठेवणे प्रतिष्ठेचे ठरणार आहे. दुसरीकडे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही माढ्यात भाजप तुल्यबळ उमेदवार देणार असून, विजयाचा दावाही केला आहे. कदाचित तेच भाजपचे उमेदवार असू शकतात, अन्यथा सहकारी पक्ष असणाºया महादेव जानकरांसाठीही भाजप मतदारसंघ सोडू शकते. तसे झाले तर जानकर होमग्राऊंडवर राष्ट्रवादीला जेरीस आणू शकतात. तसेच भाजपने पूर्ण रसद पुरविली तर जानकर हे तुल्यबळ ठरू शकतात. त्यातच राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदारांनी मतदारसंघात ठोस असे काहीच काम केले नसल्याच्या जनभावना आहेत. हा फायदाही विरोधक उचलू शकतात.
त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघात सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील राष्ट्रवादीकडे तीन, काँग्रेस, शिवसेना आणि शेकापकडे एक आहे. राष्ट्रवादीचे आणि सांगोल्याचे शेकापचे आमदार गणपतराव देशमुख हे पवार यांना मदत करणार. तसेच माणचे आमदार जयकुमार गोरे यांनाही आघाडी धर्म पाळावा लागणार आहे. राष्ट्रवादीचे पारडे जड वाटत असलेतरी विरोधकही कमी ताकद असणारे नाहीत. यासाठी २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीचा इतिहास पुरावा आहे. कारण, २००९ ला शरद पवार हे उमेदवार असतानाही सुभाष देशमुख यांनी दोन लाखांच्यावर आणि जानकर यांनी लाखभर मते मिळविली होती.
जानकर पुन्हा पवारांच्या विरोधात !मंत्री महादेव जानकर हे माढा मतदारसंघातील आहेत. त्यांचे गाव माण तालुक्यातील पळसावडे. जानकर यांनी गेल्यावेळी बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. त्यावेळी अवघ्या काही हजारांच्या मतांच्या फरकाने जानकर पराभूत झाले होते. तर २००९ ला पवारांच्या विरोधात ते माढ्यातून लढले होते. आता त्यांनी भाजपने रासपला माढा मतदारसंघ सोडल्यास पवारांच्या विरोधात लढू, असे त्यांनी जाहीर केले आहे. भाजपनेही त्यांना साथ दिली तर पवार यांना निवडणूक प्रतिष्ठेची नाहीतर खूपच अवघड ठरू शकते, हे निश्चित.