लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीत भाजपला धक्का देण्याचा राष्ट्रवादीचा डाव अखेरच्याक्षणी फसला. भाजपचा एक नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागला होता. त्याच्या मदतीने भाजपला शह देण्याची खेळी राष्ट्रवादीने आखली. पण पक्षातूनच त्याला विरोध झाल्याने डाव सोडून द्यावा लागला.
स्थायी समितीच्या नऊ जागांच्या निवडी शुक्रवारी झाल्या. यात भाजपचे ४, राष्ट्रवादीचे ३, काँग्रेसच्या २ सदस्यांची वर्णी लागली. स्थायी समितीत भाजपचे बहुमत आहे. भाजपकडे ९, तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडे ७ सदस्यसंख्या आहे. भाजपच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी राष्ट्रवादीने दोन दिवसांपासून फिल्डिंग लावली होती. भाजपच्या सदस्यांशी संपर्क साधला होता. महापौर निवडीवेळी भाजपचे सात सदस्य राष्ट्रवादीच्या गळ्याला लागले होते. त्यामुळे सभागृहात संख्याबळ ३४ आहे. त्यातही फूट पाडण्याची तयारी सुरू होती.
सकाळी साडेअकराला महासभा सुरू झाली. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शेखर माने, गटनेते मैनुद्दीन बागवान, शेडजी मोहिते, विष्णू माने महापौरांच्या दालनात ठाण मांडून होते. स्थायी समितीत भाजपचे संख्याबळ कमी करण्यासाठी रणनीती आखण्यात आली. भाजपशी संबंधित एका नगरसेवकाशी चर्चा झाली. त्यानेही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याच्यासोबत बंडखोर विजय घाडगे व आणि काँग्रेस-राष्ट्रवादीतील एक असा तिघांचा स्वतंत्र गट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. भाजपचे संख्याबळ कमी झाल्यास त्यांना स्थायी समितीतील एक जागा गमवावी लागणार होती. या जागेवर स्वतंत्र गटातील एकाला संधी देऊन स्थायी समितीत भाजप व आघाडीचे समसमान संख्याबळ आणण्याचा डाव निश्चित झाला. महापौरांना तशा सूचना दिल्या गेल्या. पण भाजपमधून फुटण्याच्या तयारी असलेल्याला राष्ट्रवादीत घेण्यास पक्षातूनच विरोध झाला. राष्ट्रवादीच्या एकाने तर पदाधिकाऱ्यांना दमात घेतले. त्याला पक्षात घेणार असाल तर आपण तुमच्यासोबत नाही, असा पवित्रा घेतला. तासभर चर्चा रंगली. अखेर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी माघार घेतली.
चौकट
निष्ठावंताची व्याख्या काय?
महापौर निवडीवेळी दगाफटका झाल्याने स्थायी समिती सदस्य निवडीवेळी भाजपने सावध पवित्रा घेतला होता. निष्ठावंतांनाच संधीची चर्चा होती. पण आता निष्ठावंताची व्याख्याच बदलली, अशी शंका भाजप नगरसेवक उपस्थित करत आहेत. सभापती निवडीवेळी भाजपची धाकधूक कायम राहणार आहे.