सांगली : महापालिकेच्या समाजकल्याण समितीतील भाजपच्या निर्विवाद वर्चस्वाला धक्का लागणार आहे. समितीत राष्ट्रवादीच्या स्वाती पारधी यांना सदस्यत्व देण्यात आल्याने सत्तेचे गणित बदलले आहे. भाजपच्या फुटीर सदस्यांच्या मदतीने ही समितीही आघाडीच्या ताब्यात येऊ शकते.
समाजकल्याण समितीत ११ सदस्य आहेत. त्यात भाजपचे ७, राष्ट्रवादीचे ३, तर काँग्रेसचा एक सदस्य आहे. गेली तीन वर्षे भाजपच्या स्नेहल सावंत या सभापती म्हणून काम पाहत आहे. नुकत्याच झालेल्या महापौर निवडीवेळी स्नेहल सावंत, आनंदा देवमाने या भाजपच्या सदस्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केले. त्यामुळे समाजकल्याण समितीतील वर्चस्वाची लढाई रंगणार होती.
पण, आता राष्ट्रवादीच्या स्वाती पारधी यांना समाजकल्याण समितीत समावेश करण्यात आला आहे. पारधी या अनुसूचित जमाती या वर्गातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे समितीत राष्ट्रवादीचे संख्याबळ चार झाले, तर आघाडीचे पाच आहे. त्याशिवाय भाजपचे दोन फुटीर सदस्यांच्या पाठिंब्यावर या समितीवर आघाडीचे वर्चस्व निर्माण होऊ शकते. त्यादृष्टीनेच पारधी यांना सदस्यत्व देण्यात आल्याची चर्चा आहे.