सांगलीः महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच आहे. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी नगरसेवक जमील बागवान, हरिदास पाटील, बिरेंद्र थोरात इच्छुक आहेत.
राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक सागर घोडके यांनी दोन दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीच्या वाट्याला ‘स्वीकृत’ची एक जागा आहे. अडीच वर्षांत आयूब बारगीर व सागर घोडके या दोघांना स्वीकृतपदी संधी देण्यात आली. घोडके यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत स्वीकृतसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. सध्या हरिदास पाटील व जमील बागवान यांनी गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्याकडे मागणीपत्र दिले आहे. जमील बागवान यांना महापालिका निवडणुकीवेळी जयंत पाटील यांनी स्वीकृतचा ‘शब्द’ दिला होता. त्यातच शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज व बिरेंद्र थोरात यांचीही नावे चर्चेत आल्याने रस्सीखेच वाढली आहे. याबाबत गटनेते बागवान म्हणाले की, स्वीकृत सदस्यांसाठी हरिदास पाटील, जमील बागवान यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे तसा अर्जही दिला आहे. संजय बजाजही इच्छुक असल्याचे समजते. मात्र, अद्याप त्यांनी मागणी केलेली नाही. स्वीकृतचा अंतिम निर्णय पालकमंत्री जयंत पाटील घेतील, असे सांगितले.