महेश देसाई
शिरढोण: कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटलांना धक्का देत खासदार संजयकाका पाटील गटाने विजयी बाजी मारली. सिंधुताई गावडे या चिठ्ठीने नगराध्यक्ष झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक फुटल्याने राहूल जगताप यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीमुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.नगराध्यक्षपदासाठी चार अर्ज दाखल झाले होते. गुरूवारी दोन अर्ज माघार घेतले आणि राष्ट्रवादीचे राहूल जगताप विरूद्ध खासदार पाटील गटाच्या सिंधुताई गावडे यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झाले. आज, शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात उमेदवार सिंधुताई गावडे आणि राहूल जगताप यांना आठ आठ अशी समान मते मिळाली. राष्ट्रवादीच्या नगरसेविका जयश्री लाटवडे गैरहजर राहिल्याने समान मते पडली.यानंतर चिठ्ठीद्वारे सिंधुताई गावडे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. गावडे यांच्या निवडीची घोषणा समिर सिंगटे यांनी केल्यानंतर खा.पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळन करीत जल्लोष केला. खासदार संजयकाका पाटील, युवा नेते प्रभाकर पाटील यांनी नुतन नगराध्यक्षा गावडे यांचा सत्कार केला. कवठेमहांकाळच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत पहिल्यांदाच मोठी चुरस पाहायला मिळाली.
दहा महिन्यापुर्वी कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूकीची महाराष्ट्रभर चर्चा झाली. खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, महांकालीच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्या पँनेल विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार सुमनताई पाटील, जि.म. बँकेचे संचालक सुरेश पाटील, युवा नेते रोहीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अशी लढत होऊन राष्ट्रवादीला दहा जागा आणि विरोधी पँनेलला सात जागा मिळाल्या. नगराध्यक्षपद हे खुल्या गटाकडे आले. अश्विनी महेश पाटील या नगराध्यक्ष बनल्या. त्यांनी सात महिन्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक लागली.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा खेळ बिघडवला. चार सदस्य फुटून ते थेट संजयकाका पाटील यांना जावून मिळाले. मात्र माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना पाठींबा देण्यास नकार देवून दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहूल जगताप यांना पाठींबा दिला. त्यामुळे जगताप व गावडे यांना समान मते मिळाली. व चिठ्ठीद्वारे सिंधुताई गावडे या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या.