सांगली : जिल्ह्यातील महापुराच्या स्थितीमुळे प्रशासनामार्फत नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. यासाठी एनडीआरएफचे एक पथक आष्टा येथे दाखल झाले असून, या पथकामध्ये २५ जवान आहेत. त्यांच्याकडून लोकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्ह्याकरिता १२ महार बटालियन पुणे यांचेही पथक ६८ जवानांसह रात्रीपर्यंत दाखल होणार आहे. आपत्तीच्या काळात शोध व सुटका इत्यादी कामकाजामध्ये एनडीआरएफ पथकाची तत्काळ मदत होणार आहे. महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालय शनिवार व रविवार दोन्ही दिवशी चालू ठेवण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पूर पाहण्याकरिता नागरिकांनी गर्दी करू नये. प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी केले.