सांगली : यंदाच्या पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थितीत मदत कार्यासाठी जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक दाखल झाले आहे. हे पथक ३० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.जिल्ह्यातील पलूस, वाळवा, शिराळा आणि मिरज तालुक्यातील १०४ गावे आणि सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेला कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पुराचा धोका होतो. २०१९ व २०२१ मधील महापुराचा अनुभव पाहता आणि हवामान खात्याकडून दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार संभाव्य पूर स्थितीत मदत व बचाव कार्यासाठी राज्य शासनाकडून सांगली जिल्ह्यासाठी एनडीआरएफचे एक पथक पाठविण्यात आले आहे. या पथकामध्ये पथकप्रमुख महेंद्रसिंह पुनिया यांच्यासह एकूण ३० जवान असून, त्यांच्याकडे बोट, लाइफ जॅकेट, लाइफ रिंग इत्यादी अनुषंगिक साहित्य उपलब्ध आहे. हे पथक ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत जिल्ह्यात कार्यरत राहणार असून पथकामार्फत जिल्ह्यामध्ये जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत सांगण्यात आले.
सांगली जिल्ह्यात एनडीआरएफचे पथक दाखल, पूरग्रस्त भागातील नागरिकांना मिळणार प्रशिक्षण
By अशोक डोंबाळे | Published: June 17, 2024 6:36 PM