रेंज अभावी गैरसोय
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले जात आहे. मात्र जत, शिराळा, आटपाडी तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये मोबाईल इंटरनेटची रेंजच मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे गायब
सांगली : शहरातील अनेक रस्त्यांवर काही वर्षांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, अलीकडे अनेक ठिकाणचे कॅमेरे खराब झाले आहेत, तर काही ठिकाणी काढून टाकले आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बदलण्याची मागणी केली जात आहे.
मास्क वापरण्याबाबत निष्काळजीपणा
सांगली : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाबतची नागरिकांमधील भीती कमी झाल्याचे जाणवत आहे. शहरात अनेकजण मास्क न वापरताच फिरत आहेत. अनेकांचा मास्क केवळ हनुवटीवर लावलेला असतो.
स्वच्छतागृहाचा अभाव
कासेगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कित्येक किलोमीटर अंतरात सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे खासगी वाहनातील प्रवाशांची गैरसोय होत असते. यासाठी खासगी ढाबे किंवा महामार्गांच्या पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहाचा आधार घ्यावा लागत आहे.
सांडपाणी रस्त्यावर
संजयनगर : सांगली शहरातील संजयनगर परिसरात योग्य ती सुविधा राखली जात नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत संबंधित महापालिका आरोग्य विभागाने काळजी घेण्याची गरज आहे.
पाण्याचा अपव्यय
सांगली : शहराच्या अनेक भागात पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. मात्र, त्याची सांगलीकरांना किंमत नसल्यासारखे झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. नागरिकांनी ही पाण्याची बचत करण्याची गरज आहे.
हॉर्नवर बंदीची मागणी
सांगली : येथील जिल्हा परिषद व दवाखाना, कोविड रुग्णालय असलेल्या परिसरात दुचाकी-चारचाकी वाहनधारकांकडून वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजवले जात आहेत. याचा नागरिकांना त्रास होत असून, वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
विक्रेत्यांमध्ये वाढ
सांगली : लॉकडाऊनमुळे शहर अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात फिरस्त्या विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोना काळात घराबाहेर न पडणाऱ्या ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी विक्रेते हातगाडे घेऊन बाजारपेठेसह रहिवासी भागातही फिरत आहेत.