वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, ग्रामपंचायतीने संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्याची गरज आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार थांबविता येणार आहे, असे मत गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
वाटेगाव येथे कोरोना आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकीमध्ये गटविकास अधिकारी शिंदे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गावामध्ये दुसऱ्या लाटेत आजअखेर गावामध्ये ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच १२७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यामध्ये सध्या ॲक्टिव्ह रुग्ण ३८, होम आयसोलेशन २६, रुग्णालयात उपचार घेणारे ९ रुग्ण आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मते म्हणाले, शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गावातील सर्व डॉक्टर्सनी त्यांच्या रुग्णालयात येणाऱ्या संशयित कोरोना रुग्णाची यादी तयार करून ती आपत्ती व्यवस्थापन समितीकडे द्यावी.
यावेळी उपसरपंच शुभांगी पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, पोलीस पाटील संतोष करांडे, ग्रा. पं. सदस्य विनोद जाधव, ग्रामविकास अधिकारी सुरेश सातवेकर, तलाठी जगन्नाथ कदम, गावातील सर्व डॉक्टर उपस्थित होते.