लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : दिघंची, ता. आटपाडी येथील बस स्थानकाची अवस्था दयनीय झाली आहे. या ठिकाणी नवीन बस स्थानकाची गरज असल्याने ते बांधावे, अशी मागणी ग्रामस्थांसह व्यापारीवर्गातून होत आहे.
दिघंची हे गाव सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. आटपाडी तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. दिघंचीमधून दिघंची-हेरवाड व मल्हारपेठ-पंढरपूर हे दोन राज्यमार्ग जात असून या मार्गांचे काम पूर्णत्वाकडे आहे. दिघंचीत नागरिकांची नेहमीच वर्दळ असते.
दिघंचीमधून मुंबई, पुणे, हैद्राबाद, औरंगाबाद, परभणी, जालना, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, गुहागर, चिपळूण आदी लांब पल्ल्याच्या एसटी बस अधिक प्रमाणात जात आहेत. प्रवासी संख्या जास्त असते. दिघंचीत हायस्कूल व कॉलेज असल्याने शालेय विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. या विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी १२ किलोमीटर आटपाडीला हेलपाटे मारावे लागतात.
दिघंचीपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावर पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना एकमेव व जवळचा मार्ग आहे. त्यामुळे भाविकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असते, बस स्थानकाविना त्यांची गैरसोय होत आहे.
सध्या हे बस स्थानक मोडकळीस आले असून नेतेमंडळी व एसटी महामंडळ अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. दिघंचीत सुसज्ज बसस्थानक व्हावे व एसटी पार्सलची व शालेय विद्यार्थ्यांना पासची सोय करावी, अशी मागणी दिघंचीकरांमधून होत आहे.
चौकट
दिघंचीतील बस स्थानकाची प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे. प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्यामुळे बसस्थानकाची नवीन इमारत करण्याची गरज आहे. यासाठी आमदार अनिल बाबर यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे, अशी माहिती सरपंच अमोल मोरे यांनी दिली.