मांगले : येथील कडक लाॅकडाऊनला मंगळवारी एक महिना पूर्ण झाला. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ आणि शेतीच्या सर्व कामांना मुभा देण्याची मागणी होत आहे. किराणा माल संपत आल्याने अनेक लोकांची अडचण झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांनी किराणा माल, कृषी सेवा केंद्रांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
गेला महिनाभर कडकडीत बंद ठेवून गृहविलगीकरणाचा निर्णय दोन दिवसापूर्वी घेतल्याने रुग्ण संख्या वाढली आहे.
मांगले येथे ५० हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाल्यानंतर सरपंच व कोरोना दक्षता समितीने २५ एप्रिललापासून पाच दिवसांचा कडक जनता कर्फ्यू पुकारला. तो संपत असताना १ मेपासून पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १५ जूनपर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर केला. या काळात वेळ असूनही स्थानिक कमिटीने सूट दिली नाही. पुन्हा चार दिवसांचा लाॅकडाऊन वाढला व त्यानंतर २६ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. तो उद्या संपत आहे. एकंदरीत एक महिना मांगलेकरांना कडक लाॅकडाऊनचा सामना करावा लागला आहे. गेल्या आठ दिवसांपासून तर गावात सहा मार्शल कमांडो आणून कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. तरीही रुग्ण संख्या कमी होत नाही. ॲक्टिव्ह रुग्णांना होमआयसोलेशन केल्याने त्याच घरातील किंवा त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. परंतु समितीने कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाहीत. अखेर आमदार मानसिंगराव नाईक यांनी मांगले आरोग्य केंद्रात आढावा बैठक घेतल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांना खडसावल्याने व प्रशासनाच्या दबावाने तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक घेऊन गृहविलगीकरणाचा निर्णय घेण्यात आला. गेल्या महिन्याभरापासून लोकांचे खूप हाल सुरू आहेत. सध्या तर शेतात, कृषी दुकानात बियाणे खरेदी करण्यासाठी जाणाऱ्यांनाही कमांडो मार्शल व पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. मांगले गाव शंभर टक्के बागायती आहे. त्यामुळे शेतीची लगभग सुरू आहे. लोकांचे घरगुती लागणारे साहित्य संपले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सूट देण्याची गरज आहे.