सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात प्रवेश करतेवेळी संबंधितांकडे 72 तासाच्या आतील निगेटीव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक असल्याचे पोलिस अधिक्षक बेळगावी कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनास कळविण्यात आले आहे.कर्नाटक राज्यात विमान/बसेस/ट्रेन/वैयक्तिक वाहन आदि व्दारे प्रवेश करणाऱ्यांना 72 तासाच्या आतील निगेटीव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र अनिवार्य आहे. निगेटीव्ह आरटीपीसीआर रिपोर्टची तपासणी बोर्डिंगच्यावेळी विमान कर्मचाऱ्याव्दारे करण्यात येईल. बस ने प्रवास करणाऱ्यांना निगेटीव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवल्यानंतरच तिकीट दिले जाईल. ज्यांनी ऑनलाईन तिकिट बुक केले आहे त्यांचा रिपोर्ट बोर्डिंगवेळी बसचे कंडक्टर तपासतील.
ट्रेनमध्ये टीटीई रिपोर्ट तपासतील. वैयक्तिक वाहनाव्दारे येणाऱ्यांची टोल गेट / एक्झिट पॉईंट वर टेस्टिंग रिपोर्टची रँडम तपासणी केली जाईल. महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान अल्पकालीन प्रवास करणाऱ्यानांही 72 तासाच्या आतील निगेटीव्ह आरटीपीसीआर प्रमाणपण आवश्यक आहे. निगेटीव्ह प्रमाणपत्र 7 दिवसांच्या कालावधीसाठी वैध असेल.
याशिवाय 14 दिवस ते स्वत: त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवतील. श्वसना संबंधी लक्षणे आढळल्यास जसे ताप, खोकला, थंडी, घसा, श्वास घेण्यास त्रास आदि लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन कोविड-19 ची तपासणी करून घ्यावी, असे पोलिस अधिक्षक बेळगावी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.