शिराळा
: येथील नवजीवन वसाहतीजवळील पुलावरून पडलेल्या प्रकाश पाटील यांचा मृत्यू बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या हालगर्जीपणामुळे झाला आहे. याची चौकशी करून आठ दिवसांत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा शिवसेना, युवासेनेच्यावतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, या नवीन बांधण्यात आलेला पूल गेल्या ७ ते ८ महिन्यांपूर्वी पूर्ण झाला आहे. या नवीन पूल बांधकामाबाबत शासनाच्या नियमानुसार कामाचा माहितीफलक, कामाची मुदत, काम चालू असलेला फलक उभारण्यात आला नाही. पुलाच्या दोन्ही बाजूंनी लोखंडी अँगल उभा केले असून, त्यास आडवे पाईप रिलिंग बसवणे आवश्यक होते; मात्र ठेकेदार व बांधकाम विभाग यांनी उभ्या अँगलला आडवे पाईप रिलिंग न बसवल्यामुळे पुलावर संरक्षण नाही. यामुळेच २० फूट खाली पडून छगन ऊर्फ प्रकाश गणपती पाटील (रा. कार्वे, ता. वाळवा) हे मृत झाले. त्यांच्या मृत्यूस बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार जबाबदार आहे. त्यांची चौकशी करून आठ दिवसांत गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष संतोष हिरुगडे, शहरप्रमुख नीलेश आवटे, उपशहर प्रमुख महादेव माने, अभिजित दळवी, स्वप्निल निकम उपस्थित होते.