सांगली : जिवापेक्षा मोबाईलवरील संभाषणाला प्राधान्य देत वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वत:सह दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालून हे वाहनधारक सुसाट सुटले आहेत. त्यांना ना अपघाताची भीती वाटते ना पोलिसांच्या कारवाईची. त्यामुळे आता अशा वाहनधारकांविरोधात कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात २०१९ या वर्षात वाहन चालविताना मोबाईल वापरणाऱ्या २ लाख ६६ हजार हजार वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. वाहन चालविताना मोबाईल वापरण्यामुळे एकूण १०० अपघात होऊन त्यात १३ जणांचा बळी गेला. अन्य जखमी झाले. सांगली जिल्ह्यातही असे अपघात होत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असे वाहनधारक सुसाट वेगाने जात आहेत. ज्याठिकाणी वाहतूक पोलीस नाहीत, अशाठिकाणी निष्काळजीपणा अधिक दिसून येतो. त्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. दुचाकी, चारचाकी व मोठ्या वाहनांचे अनेक चालकही सर्रास वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना आढळतात. पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतरही पुन्हा ती चूक करण्याचा प्रकार ते करतात. सांगली जिल्ह्यात २०१९ मध्ये सर्वाधिक म्हणजे ८ हजार ६३३ वाहनधारकांना मोबाईल वापरत वाहन चालविल्याबद्दल १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. दंडाची रक्कम आता वाढविण्यात आली असली, तरी असे गुन्हे करण्याच्या प्रमाणावर अद्याप आळा बसलेला नाही. त्यामुळे परवाना रद्दपासून कारावासापर्यंतच्या कडक शिक्षेची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच अशा बेशिस्त वाहनधारकांना आळा बसेल.
चौकट
दंड काय
वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास आता एक हजार ते पाच हजार रुपये दंड किंवा ६-१२ महिने तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. हाच गुन्हा पुन्हा केल्यास १० हजार रुपये दंड किंवा दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. केंद्र शासनाने मोटार वाहन कायदा-२०१९ अंतर्गत नुकतेच याबाबत बदल करून कडक तरतुदी केल्या आहेत.
चौकट
मोबाईलवर बोलत वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा आहे. सार्वजनिक व वैयक्तिक सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण होऊ शकतो. वाहनधारकांना याबाबत अधिक काळजी घ्यावी लागते. बऱ्याचदा पोलिसांना पाहिले की मोबाईल बंद करण्याचे व लपवालपवी करण्याचे प्रकार वाहनधारकांकडून होत असतात. तरीही पोलिसांमार्फत या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाते.
- प्रज्ञा देशमुख
सहायक पोलीस निरीक्षक