सांगली, दि. १२ : गोव्यातून विदेशी दारुची वाहतूक करणाºया महिलेसह दोघांना नेर्ले (ता. वाळवा) येथे थरारक पाठलाग करुन पकडण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सांगली व कोल्हापूरच्या संयुक्त भरारी पथकाने गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी महिलेसह दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून विदेशी दारुचा साठा, अलिशान मोटार असा २० लाखांचा माल जप्त केला आहे.
अटक केलेले संशयित पुणे जिल्ह्यातील आहेत. पुढील तपासात अडचण निर्माण होऊ नये, यासाठी त्यांची नावे सांगण्यास नकार दिला. ते गोवा येथून मोटारीने (क्र. एमएच ४२-एच-९) विदेशी दारुची वाहतूक करणार असल्याची माहिती कोल्हापूरच्या विभागीय आयुक्त संगीता दरेकर यांना मिळाली होती. त्यानुसार दरेकर यांचे पथक बुधवारी मध्यरात्रीपासून नेर्ले (ता. वाळवा) येथे सापळा लाऊन होते.
मिळालेल्या माहितीप्रमाणे पहाटे तीन वाजता ही क्रमांकाची मोटार जाताना दिसली. पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा केला. पण मोटार थांबली नाही. अखेर पाठलाग करुन मोटार पकडली. मोटारीची झडती घेतल्यानंतर यामध्ये साडेचार लाखांचा विदेशी दारुसाठा सापडला. मोटारीचा चालक व संबंधित महिलेस अटक केली.