सांगली : येथील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात ‘एमएस्सी एम्बेडेड’ हा नवा संगणकीय अभ्यासक्रम सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात प्रथमच तो सुरू होत असल्याची माहिती लठ्ठे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांतिनाथ कांते व सचिव सुहास पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, दोन वर्षांचा हा पदव्युत्तर अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल. हार्डवेअर व सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे स्वयंचलित उपकरणे तयार करणे, ही या अभ्यासक्रमामागील संकल्पना आहे. शंभर टक्के नोकरी तसेच स्वत:चा व्यवसाय यातून साध्य होतो. इलेक्ट्रॉनिक्स व संगणक शास्त्रातून सायन्स पदवी घेतलेल्या तसेच अभियांत्रिकी पदवीधारकांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. थेअरी व प्रत्यक्ष डिझाईन या दोहोंचा समावेश अभ्यासक्रमात आहे. एनआयआयटी व आयआयटीमध्ये या दर्जाचे अभ्यासक्रम शिकवले जातात. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत प्रथमच तो सांगलीत उपलब्ध झाला आहे. विनाअनुदानित तत्त्वावर कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात तो सुरू होईल. याद्वारे इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये नोकरीच्या संधी मिळणार असल्याचे कांते म्हणाले.