फोटो ओळी - राजारामबापू साखर कारखान्याच्या ५१ व्या वार्षिक ऑनलाईन सभेत जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पी. आर. पाटील, विजयराव पाटील, प्रतीक पाटील, आर. डी. माहुली उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : साखर निर्मितीपेक्षा साखर विक्रीचे नवे संकट साखर उद्योगासमोर निर्माण झाले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी इथेनॉल निर्मितीची क्षमता वाढविण्याबरोबर नव-नवे मार्ग शोधायला हवेत, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
राजारामबापू साखर कारखान्याच्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ही सभा ऑनलाईन झाली. पी. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष विजयराव पाटील, युवा नेते प्रतीक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयंत पाटील म्हणाले, कोरोनाची परिस्थिती पाहून कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगावी संपर्क दौरा करून ऊस उत्पादकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत. एकरी उत्पादन वाढविण्यावर भर द्यायला हवा.
पी. आर. पाटील म्हणाले, देशात अतिरिक्त साखर उत्पादन होत असल्याने साखर विक्रीचे मोठे आव्हान साखर उद्योगासमोर आहे. त्यामुळे एफआरपी देण्यासाठी कर्जाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. इथेनॉल निर्मिती तसेच वीज उत्पादनाने काहीसा आर्थिक हातभार लागला आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, रवींद्र पिसाळ यांनी काही सूचना मांडल्या. रणजित पाटील, माणिक पाटील, डॉ. प्रकाश पाटील, धनाजी पाटील, पोपटराव जगताप, संभाजी पाटील यांच्यासह ऊस उत्पादकांनी ठराव मंजूर करण्याची सूचना मांडली. सर्व विषय मंजूर करण्यात आले.
यावेळी संचालक विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, देवराज पाटील, बाळासाहेब पवार, पै. भगवान पाटील, आनंदराव पाटील, प्रदीपकुमार पाटील, कार्तिक पाटील, दादासाहेब मोरे, सचिव प्रताप पाटील आदी उपस्थित होते.
कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.
चौकट
जयंतरावांकडून विचारणा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या इतिहासात ही पहिली ऑनलाईन सभा झाली. प्रत्येक विषयाचे वाचन झाल्यावर जयंत पाटील स्वतः ऑनलाईन सभासदांना आपणास काही बोलायचे आहे का, अशी विचारणा करीत होते.