लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : रयत शिक्षण संस्थेत गेल्या ३३ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या पुष्पलता फडतरे यांनी गरीब विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून काम केले. सामाजिक सेवेत नेहमी अग्रेसर असलेल्या फडतरे यांच्यामुळे शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवा नेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केले.
विटा येथील विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार कनिष्ठ महाविद्यालयात उपप्राचार्यापदी नियुक्ती झाल्याबद्दल पुष्पलता फडतरे यांचा प्रतीक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
बाळासाहेब पाटील म्हणाले, फडतरे यांनी सांगली, कोल्हापूरच्या महापुरावेळी संपूर्ण कुटुंबासह झोकून देऊन लाखो रूपयांची औषधे स्वखर्चातून पूरग्रस्तांना देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. भामरागडमधील पूरपरिस्थितीत अनिकेत आमटे यांच्याकडेही औषधे पाठवली. निसर्ग टिकला पाहिजे, यासाठी त्या नेहमीच पुढाकार घेत असल्याचे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश मीडिया सेलचे बिरू केसकर, युवक राष्ट्रवादीचे खानापूर विधानसभा अध्यक्ष हरी माने, विटा शहराध्यक्ष सिध्दार्थ शितोळे, अशिष पवार, ज्ञानदेव फडतरे, जयदीप देसाई, आदी उपस्थित होते.