कडेगाव : पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि भाजपचे संग्रामसिंह देशमुख हे पलूस-कडेगाव मतदारसंघातील नेते आमने-सामने लढले आणि या लढाईत अरुण लाड यांनी ४८ हजार ८२४ इतक्या मताधिक्याने विजय मिळविला. या निकालाने पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली. कदम-लाड गटातील मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे; तर लाड-देशमुख गट एकमेकांपासून दुरावले आहेत. यामुळे देशमुख गटाला ‘एकला चलो रे’ अशी राजकीय वाटचाल करावी लागणार आहे.
पलूस-कडेगाव मतदारसंघात कदम-देशमुख गटातील परंपरागत राजकीय सत्तासंघर्ष सर्वश्रुत आहे. येथे १९९० पासून २०१४ पर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत लाड व देशमुख गट एकसंध होते. त्यामुळे माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांना त्यांच्या राजकीय वाटचालीत अनेकदा संघर्ष करावा लागला. मात्र तरीही डॉ. पतंगराव कदम यांनी मतदारसंघात सलग नऊ निवडणुका लढवल्या आणि सहावेळा विजय मिळविला.
डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या २०१८ च्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र डॉ. विश्वजित कदम हे बिनविरोध आमदार झाले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपात पलूस-कडेगावची जागा शिवसेनेकडे गेली. यामुळे भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांनी निवडणूक लढविली नाही. या निवडणुकीत लाड गटाचा पाठिंबा मिळाल्याने डॉ. विश्वजित कदम यांनी विक्रमी मताधिक्य घेऊन शिवसेनेचे संजय विभूते यांच्याविरोधात विजय मिळविला होता. त्यावेळी विश्वजित कदम यांनी अरुण लाड यांना पदवीधर निवडणुकीत सहकार्य करण्याचा शब्द दिला होता. विश्वजित यांनी दिलेला शब्द आणि आघाडी धर्माचे पालन करीत नुकत्याच झालेल्या पुणे पदवीधर निवडणुकीत अरुण लाड यांना साथ दिली आणि त्यांच्या विजयात मोलाचे योगदान दिले. यामुळे आता लाड आणि कदम गट एकसंध झाल्याचे चित्र दिसत आहे.
फोटो: विश्वजित कदम अरुण लाड व संग्रामसिंह देशमुख यांचा फोटो वापरणे