सांगली : गुड्डापूर, कुलाळवाडी, पांढरेवाडी, भिवर्गी, सिध्दनाथला नवीन आरोग्य उपकेंद्रांना जिल्हा परिषदेने मंजुरी दिली. म्हैसाळ, हिवतड, लेंगरे केंद्रांच्या दुरुस्तीला मंजुरी, तर झरे, संतोषवाडी व दुधगावमध्ये नव्या इमारती बांधण्याचे ठरले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेत ही माहिती देण्यात आली. आरोग्य सभापती आशा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले की, जिल्हयात ७१ टक्के जणांचा कोरोनाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. दुसऱ्या डोसचे प्रमाण कमी म्हणजे फक्त २८ टक्के आहे. १८ वर्षांवरील १५ लाख ४८ हजार ६०५ लाभार्थ्यांना पहिला डोस दिला आहे. दुसरा डोस ६ लाख ८ हजार ८९५ जणांना दिला आहे. एकूण लसीकरण २१ लाख ५७ हजार ५०० इतके झाले आहे. म्युकरमायकोसिसचा नवा रुग्ण सापडलेला नाही, मात्र आजवरची संख्या ३८५ झाली आहे. ५८ जणांचे मृत्यू झाले आहेत. जंतनाशक मोहिमेत गोळ्या न मिळालेल्या मुलांसाठी मंगळवारी (दि. २८) पुन्हा मोहीम राबविण्यात येणार आहे.
नव्या उपकेंद्रांचे ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत व नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करून शासनाकडे पाठवले जातील.
सभेला माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील तसेच तालुका आरोग्याधिकारी उपस्थित होते.