युवक कॉँग्रेसमध्ये सकारात्मक राजकारणाचा नवा पॅटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 01:29 AM2018-09-14T01:29:44+5:302018-09-14T01:30:15+5:30
सत्यजित तांबे यांना संधी; विश्वजित कदम यांची समन्वयाची भूमिका
कडेगाव (जि. सांगली) : प्रदेश, जिल्हा व विधानसभा क्षेत्रातील युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडी लोकशाही मार्गाने पक्षांतर्गत निवडणुकीच्या माध्यमातून होतात. ही निवडणूक ९, ११ व १२ सप्टेंबररोजी राज्यभरात पार पडली. या निवडणुकीचे पडसाद उमटून पक्षांतर्गत संघर्ष नको, यासाठी विद्यमान प्रदेशाध्यक्ष आ. डॉ. विश्वजित कदम यांनी राज्यभर समन्वयाची भूमिका घेतली आहे.
आ. कदम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आ. बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते व इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून युवक काँग्रेसअंतर्गत संघर्षाला पूर्णविराम दिला आहे. यामुळे आता युवक काँग्रेसचे विद्यमान उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांना युवक कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी संधी मिळणार, हे निश्चित मानले जात आहे. आता केवळ मतमोजणीची औपचारिकता बाकी असल्याची चर्चा आहे.
युवक काँग्रेसमध्ये प्रारंभी बूथ कमिटीच्या पदाधिकारी निवडी झाल्या. त्यानंतर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव या पदासाठी अनेक उमेदवार रिंगणात होते. अशा परिस्थितीत आमदार विश्वजित कदम यांनी तोडजोडीची भूमिका
घेऊन सत्यजित तांबे यांना प्रदेशाध्यक्ष व आमदार अमित झनक यांना प्रदेश उपाध्यक्षपदी संधी देण्याचे आवाहन केले. या समन्वयामुळे पक्षांतर्गत संघर्ष टळला आहे. आ. कदम यांनी पक्षांतर्गत लोकशाहीच्या मार्गाने होणाऱ्या निवडणुका जिंकून सलग दोनवेळा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळविले होते.
राज्यातील राजकारणात काँग्रेसचा संघर्ष भाजपच्या विचारधारेशी आहे. हे लक्षात घेता काँग्रेस पक्षांतर्गत संघर्ष टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या निवडणुकीत राज्यभरातील कार्यकर्त्यांनी मला पुढाकार घेण्याची विनंती केली. त्यानंतर समन्वय साधून निर्णय घेण्याचे ठरले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि युवक काँग्रेसमधील इच्छुकांशी चर्चा केली. समितीतील पदाधिकारी म्हणून कोणाला घ्यायचे यावर एकत्र बसून शिक्कामोर्तब केले. यातून राज्यभरातील कार्यकर्त्यांपर्यंत सकारात्मक संदेश जाईल.
- आ. विश्वजित कदम