लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील काळीखण सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी साडेआठ कोटींचा आराखडा तयार करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली.
सांगली शहरातील काळी खण सुशोभीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. पालकमंत्री पाटील यांनी काळी खणीची पाहणी करून आराखड्याची माहिती घेतली. सुमारे १५ एकर जागेत काळी खण असून, त्यामध्ये नैसर्गिक झरे आहेत. ही खण पर्यटनासाठी विकसित केली जात आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून एक कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीतून वॉकिंग ट्रक, बगीचा, कारंजा व ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत, तर दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी साडेआठ कोटीचा प्रस्ताव तयार करून, तो शासनाच्या पर्यटन विभागाकडे पाठविण्याची सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली आहे. सुशोभीकरणाचे काम पूर्ण होताच, जनतेसाठी आकर्षक पर्यटनस्थळाची सोय होणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामाचा शुभारंभ येत्या १५ दिवसांत मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.
काळी खण सुशोभीकरण पाहणी प्रसंगी मा.ना.मंत्री जयंत पाटील सो, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, संजय बजाज, शेखर माने, सुरेश पाटील, पद्दमाकर जगदाळे, राहुल पवार इत्यादी उपस्थित होते.