विटा : गाव करील ते राव करील काय, असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय खानापूर विधानसभा मतदार संघातील पाडळी (ता. तासगाव) येथे आला. स्वातंत्र्योत्तर काळापासून मागणी होत असलेला आणि शासकीय दरबारी पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष झालेला पाडळी येथील गोसावी व कुंभार वस्तीला जोडणारा दीड किलाेमीटरचा रस्ता गावकऱ्यांनी शासनाच्या निधीची प्रतीक्षा न करता लोकवर्गणीतून तयार केला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाडळी येथील गोसावी व कुंभार वस्तीला जोडणाऱ्या दीड किलाेमीटर लांबीच्या रस्त्याचा प्रश्न स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासून प्रलंबित होता. यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनही त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे, या दोन्ही वस्तीवरील शेतकऱ्यांचा गावात तसेच शेतात जाण्या-येण्यासाठी रस्ता नव्हता. शासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी शासनाच्या मदतीशिवाय रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. उपसरपंच अजित पाटील यांच्या पुढाकाराने कुंभार व गोसावी वस्तीवरील लोकांनी लोकवर्गणी जमा करण्यास सुरूवात केली. बघता-बघता एक ते सव्वा लाख रूपयांची लोकवर्गणी जमा झाली. शासनाच्या इस्टिमेटनुसार तीन ते चार लाख रूपये खर्चाचा रस्ता लोकवर्गणीतून जमा झालेल्या केवळ लाखभर रूपयांत तयार करण्यात आला.
पाडळी येथे लोकसहभागातून १४ फूट रूंदीचा व दीड किलाेमीटर अंतराचा रस्ता पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाच्या निधीची वाट न पाहता, लोकवर्गणी व लोकसहभागातून कुंभार व गोसावी वस्तीवरील शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
यावेळी सरपंच वंदना सुर्वे, सदस्य विनोद धोत्रे, सुनील पाटील, सुधीर मैदानकर, शरद शिंदे, संतोष यादव, लालासाहेब कुंभार, शरद कुंभार, नंदकुमार कुंभार, आकाश कुंभार, रमेश कुंभार, बबन कुंभार, संपत कुंभार, शहाजी गोसावी, विष्णू गोसावी, निशांत गोसावी, वसंत गोसावी, विश्वास पाटील, किरण पाटील, धनाजी पाटील, किस्मत मुलाणी उपस्थित होते.
फोटो : १६०६२०२१-विटा-पाडळी रोड
ओळ : पाडळी (ता. तासगाव) येथे ग्रामस्थांनी स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम उपसरपंच अजित पाटील यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून पूर्ण करण्यात आले.