सांगली : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून नव्या घरकुलाचे स्वप्न उराशी बाळगून रस्त्यावरच जीवन कंठणाऱ्या झोपडपट्टीधारकांना गुरुवारी महापौर हारूण शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी मोठा दिलासा दिला. यंदाची दिवाळी नव्या घरकुलात साजरी करूया, असे आवाहन करीत, दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप केले जाईल, त्यासाठी ठेकेदारांनी अपूर्ण राहिलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, असे आदेशही दिले. केंद्र शासनाच्या निधीतून महापालिकेने झोपडपट्टीधारकांसाठी घरकुलांची योजना राबविली आहे. तब्बल अडीच हजार घरकुलांच्या या योजनेसाठी केंद्रानेही ९८ कोटींचा निधी दिला होता. एका घरकुलासाठी ८० हजार रुपये याप्रमाणे निविदा काढण्यात आली. पण जादा दराने निविदा दाखल झाल्याने घरकुलाची किंमत एक लाख ३० हजाराच्या घरात पोहोचली. नंतरच्या काळात वारंवार मुदतवाढ व दरवाढ दिल्याने या घरकुलाची किंमत दीड ते पावणेदोन लाखाच्या पुढे गेली. याच घोळात अडीच हजार घरकुलांपैकी केवळ दीड हजार घरकुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले. सांगलीतील इंदिरानगर झोपडपट्टीतील घरकुलांची योजना बारगळली होती. गेली दहा वर्षे घरकुल योजनेचे पुराण सुरू आहे. झोपडपट्टीधारकांना रस्त्याच्या कडेला पत्र्याचे शेड मारून राहावे लागले. महापालिकेने वीज व पाण्याची व्यवस्था केली असली तरी, इतर नागरी सुविधांपासून झोपडपट्टीधारक वंचित राहिले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून घरकुलांचे वाटप करण्याची मागणीही जोर धरू लागली होती. त्यात दीड हजार घरकुलांचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. केवळ दारे, खिडक्या, काचा, फ्लोअरिंग अशी किरकोळ कामे शिल्लक आहेत. ठेकेदाराकडून या कामासाठी विलंब लावला जात आहे. बुधवारी महापौर हारूण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी संजयनगर येथील धोत्रेआबा झोपडपट्टी, बालहनुमान, शिंदे मळा येथील पत्र्याची चाळ या तीन घरकुल योजनांना भेट देऊन पाहणी केली. आयुक्त खेबूडकर यांनी झोपडपट्टी धारकांचीही भेट घेऊन चर्चा केली. यावेळी झोपडपट्टी धारकांनी आपल्या व्यथा आयुक्तांसमोर मांडल्या. आणखी किती काळ रस्त्यावर राहावे लागणार आहे?, हक्काचे घर कधी मिळणार?, अशी विचारणा त्यांनी केली. आयुक्तांनी घरकुल ठेकेदाराशी चर्चा करून, केवळ दहा टक्के काम कशासाठी अपूर्ण ठेवले आहे?, असा जाब विचारला. येत्या दिवाळीपूर्वी झोपडपट्टीधारकांना घरांचे वाटप करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. लाभार्थ्यांची यादी अंतिम करून सोडत काढावी. जिथे लाभार्थ्यांबाबत वाद असतील, तिथे कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. प्रत्येक लाभार्थ्याचे प्रॉपर्टीकार्ड देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केले. यंदाची दिवाळी झोपडपट्टीधारकांनी नव्या घरात साजरी करावी, असे सांगत त्यांनी लाभार्थ्यांना दिलासा दिला. (प्रतिनिधी).हक्काचे घर : लाभार्थ्यांना न्यायकाँग्रेसचे नेते मदनभाऊ पाटील यांनी महापालिका क्षेत्र झोपडपट्टीमुक्त करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी काँग्रेस सत्ताकाळात केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. आता दीड हजार झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर मिळणार आहे. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी दिवाळीपूर्वी घरकुलांचे वाटप करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे झोपडपट्टीधारकांनाही न्याय मिळेल, असे स्थायी सभापती संतोष पाटील यांनी सांगितले.
झोपडपट्टीधारकांची दिवाळी नव्या घरकुलात!
By admin | Published: July 21, 2016 11:52 PM