आष्टा : केळीचे पीक काढल्यानंतर त्यामध्ये ऊस लावताना मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. केळीचे पीक काढल्यानंतर त्या शेतात ऊस शेतीचे नवीन तंत्रज्ञान वापरल्यास मशागतीच्या खर्चात बचत होऊन उत्पादनात निश्चित वाढ होते, असे मत पोखर्णी (ता. वाळवा) येथील अशोका अॅग्रो फर्टचे तंत्र अधिकारी बिभीषण पाटील यांनी व्यक्त केले.
कोरोनाचा शेती व्यवसायावर परिणाम झाला आहे. शेतातील केळी पीक काढणीनंतर दुसऱ्या पिकासाठी शेत तयार करण्यासाठी ट्रॅक्टरद्वारे होणाऱ्या मशागतीचे दर वाढले आहेत. यावर उपाय म्हणून कॉस्ट कटिंग पद्धत शेतकऱ्याला वरदान ठरत आहे.
केळीचे पीक काढल्यानंतर जमीन तयार करण्यासाठी केळीचे खुंट तोडणे, शेताबाहेर काढणे किंवा खुंटाचे तुकडे करणे, रोटाव्हेटर, दोन ते तीन वेळा नांगरट, खुरट, सरी अशा प्रकारच्या ट्रॅक्टरच्या मशागतीसाठी सुमारे ३५ ते ४० हजार रुपये खर्च होतो. मशागतीसाठी वेळ लागतो. यावर उपाय म्हणून कॉस्ट कटिंग तंत्रज्ञानाचा वापर केल्यास खर्चात बचत होऊन केळीचे अवशेष कुजून जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होऊन उत्पादन वाढते.
केळीचे पीक काढणीनंतर केळीचे खुंट सरीवर सरळ उभे ठेवावेत. सरीमध्ये पॉवर टिलरच्या साहाय्याने मशागत करून ऊस लागण अथवा ऊस नर्सरीची रोपे लावावीत. कालांतराने येणाऱ्या केळीच्या नवीन कोंबावर तणनाशकाचा वापर करावा. दोन महिन्यांनी बाळ भरणी, सहा महिन्यांनी मोठी बाळ भरणी, यामध्ये केळीचे अवशेष पूर्णपणे कुजून याचा फायदा ऊस पिकास होतो. जमिनीचा पोत सुधारतो. ह्युमसच्या माध्यमातून जमिनीची उत्पादकता टिकून राहते, तण उगवण क्षमता कमी होते व खर्चातही बचत होते.
चौकट
पारंपरिक शेतीला फाटा देत केळी पिकानंतर कॉस्ट कटिंग पद्धत वापरून ऊस लागण केल्यास खर्चात बचत होऊन चांगला बेवड म्हणून केळीचा उपयोग ऊस उत्पादन वाढीस करता येईल. मशागतीसाठी लागणारा वेळ वाचून ऊस पीक घेता येईल, तणावरही नियंत्रण मिळविता येईल.
- बिभीषण पाटील, तंत्र अधिकारी, अशोका अॅग्रो फर्ट, पोखर्णी.
फोटो-१३१२२०२०-आयएसएलएम-आष्टान्यूज
आष्टा केळी
ओळ :
केळी काढल्यानंतर खुट सरीवर ठेवल्यास कुजून त्याचे खत मिळत आहे.