तासगाव : परिचारिका म्हणून कामावर येऊन तासगाव येथील खासगी रुग्णालयातून एक दिवसाच्या नवजात अर्भकाच्या अपहरणाच तासगाव पाेलिसांनी साडेसात तासांत छडा लावला. अपहरण करणारी महिला स्वाती छबुराव माने हिच्यासह तिचा पती जितेंद्र थाेरात यांना अटक केली. सोमवारी या दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.तासगाव येथील सिद्धेश्वर चौकातील सरस्वती आनंद रुग्णालयात चार दिवसांपूर्वीच स्वाती माने ही परिचारिका म्हणून नोकरीस लागली. रविवारी (दि. २४) तिने डॉक्टरना दाखविण्याचा बहाणा करीत नवजात अर्भकासह रुग्णालयातून पलायन केले. हा प्रकार समाेर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तिचा शोध घेत केवळ साडेसात तासांत बाळाची सुटका केली. संबंधित महिलेसह तिच्या पतीला येडेमच्छिंद्र येथून अटक केली.
सोमवारी दाेघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सोमवारी पोलिसांनी स्वातीकडे अपहरणाबाबत चाैकशी केली असता तिने ‘माझी स्वतःची प्रसूती झाली होती, माझं बाळ हरवलं आहे.’ अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन तपासाला टाळाटाळ केली. मात्र, लवकरच सखोल तपास करून, अपहरणाची नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
महिलेची पार्श्वभूमी संशयास्पद
बाळाचे अपहरण करणारी स्वाती माने ही महिला मूळची सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील आहे. मात्र, ती विटा, किर्लोस्करवाडी आणि येडेमच्छिंद्र येथे राहिल्याची चर्चा आहे. सध्या तिच्यासोबत अटकेत असलेला येडेमच्छिंद्र येथील जितेंद्र थोरात हा तिचा तिसरा पती असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली होती. महिलेची एकूणच पार्श्वभूमी संशयास्पद असून, बालकाचे अपहरण करण्याचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट होऊ शकला नाही.