लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरज तालुक्यातील तुंग येथे सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने छताच्या फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्योती अक्षयकुमार भानुसे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. स्वयंपाक येत नाही, लिहिता-वाचता येत नाही यासह वारंवार एकच रांगोळी काढते, अशा कारणावरून सासरची मंडळी तिला मानसिक त्रास देत होती. ज्योतीचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. याप्रकरणी मयत ज्योतीचे वडील मंगेश शंकर कवठेकर (रा. रेठरे धरण, ता. वाळवा) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पती अक्षयकुमार शिवाजी भानुसे, सासरा शिवाजी मायाप्पा भानुसे, सासू मंगल शिवाजी भानुसे यांच्याविरोधात ज्योतीचा छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रेठरे धरण (ता. वाळवा) येथील मंगेश शंकर कवठेकर यांची मुलगी ज्योती हिचा ७ डिसेंबर २०२० रोजी तुंग येथील अक्षयकुमार भानुसे याच्याशी विवाह झाला होता. अक्षय हा मुंबईत माथाडी कामगार म्हणून कामास होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच सासरच्या लोकांनी ज्योतीला तुला लिहिता-वाचता येत नाही, तू शाळा शिकली नाहीस, तू रोज एकच रांगोळी काढतेस, अशा कारणावरून त्रास देण्यात सुरुवात केली होती तर पती अक्षय हा तू काळी आहेस, मला पसंत नाहीस, मला दुसरे लग्न करायचे आहे म्हणून तिला त्रास देत होता. ज्योतीने हा सर्व प्रकार चुलते मारुती कवठेकर यांना फोन करून सांगितला होता. त्यानंतर बुधवारी सायंकाळी ज्योतीचा सासरा शिवाजी याने कवठेकर यांना फोन करून तुमची मुलगी घेऊन जावा, असे सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी येत असल्याचे कवठेकर यांनी सांगितले होते. मात्र, बुधवारी रात्रीच ज्योती हिने तुंग येथे घरात सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्या छळाला कंटाळूनच मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद कवठेकर यांनी दाखल केली आहे. त्यानुसार तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व छळप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.