संबंधित युवती जत येथील आहे. घरी लग्नाची चर्चा सुरू झाल्यानंतर महिन्याभरापूर्वी ती प्रियकरासाेबत पळून गेली हाेती. कुटुंबीयांनी शाेध घेऊन तिला पुन्हा घरी आणले. आठ दिवसांपूर्वी तिचा उमदी येथील तरुणाशी विवाह करून देण्यात आला हाेता. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास दहा ते पंधरा तरुण दुचाकी-चारचाकी वाहनांतून उमदीत आले. संबंधित युवतीच्या घरात शिरून सिनेस्टाईलने तलवारीचा धाक दाखवून तिला घराबाहेर काढले. कुटुंबीयांना दमदाटी करीत सर्वजण गावातून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच उमदी व जत पाेलिसांनी तातडीने हालचाली करीत नाकाबंदी केली. कारवाईदरम्यान या युगुलास पळून जाण्यास मदत करणाऱ्या सहा संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, संबंधित प्रियकर व प्रेयसी फरार झाले. अटक केलेल्या सहाजणांकडून गुन्ह्यासाठी वापरलेल्या गाड्या व तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
उमदीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, श्रीशैल वळसंकर, जतचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल भोसले, सचिन जवंजाळ, बजरंग थोरात, शरद शिंदे, विकास गायकवाड, राजेंद्र पवार, होमगार्ड डोईफोडे यांनी ही कारवाई केली.