कोकरूड : सर्वाेच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांचा आदेश न मानणाऱ्या दालमिया शुगर प्रशासनाच्या निषेधार्थ माजी कामगारांनी सोमवारी दुसऱ्यादिवशी निनाईदेवी साखर कारखान्याचे प्रवेशद्वार बंद करून प्रवेशद्वारासमोरच सहकुटुंब ठिय्या आंदोलन केले. आंदोलनामुळे करुंगली (ता. शिराळा) येथील कारखाना कार्यस्थळावरील वातावरण तप्त बनले आहे.यासंदर्भात शिराळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हणमंतराव पाटील म्हणाले की, रविवारी निनाईदेवी कारखान्याच्या माजी कर्मचाऱ्यांचा मेळावा पार पडला. दालमिया प्रशासनाने जुन्या ३०० कामगारांना जिल्हाधिकारी व कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांच्यासमोर ठरल्याप्रमाणे कामावर हजर करून घ्यावे, सोलापूर व इतर ठिकाणच्या कामगारांना कामावर घेऊन येथील स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय केला जात आहे. न्यायालयाचा आदेश न जुमानता बाहेरील कामगारांना घेऊन नवीन हंगामाची दालमिया प्रशासनाने सुरुवात करताना, करूंगली व आरळा ग्रामपंचायतींची परवानगी घेतलेली नाही. जुन्या कामगारांना वारंवार ब्रेक दिला जात आहे. प्रत्येक महिन्याला कामगारांना नवीन आॅर्डर न देता त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जात आहे. हा अन्याय दूर झाला पाहिजे व कामगारांना नव्याने कायमस्वरूपी आॅर्डर द्यावी, असा आदेश कारखाना प्रशासनाने घ्यावा, अशा मागण्या कर्मचाऱ्यांची संघटना व श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने केल्या आहेत.निवृत्ती नायकवडी, शिवाजी पाटील, भास्कर महिंद, ज्ञानदेव पाटील, राजेश जाधव, शिवाजी माळी, संदीप पेठकर, पांडुरंग खोत, भगवान गायकवाड, सर्जेराव नांगरे, मच्छिंद्र जंगम, दीपक पाटील यांच्यासह चारशे कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला होता. (वार्ताहर)कर्मचारी आक्रमक : प्रशासनाचा निषेधसोमवारी दिवसभर निनाईदेवी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब प्रवेशद्वारावर तळ ठोकून प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यासंदर्भात लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलनाला वेगळी दिशा लागून हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आहे.
‘निनाईदेवी’ कामगारांचा दुसऱ्या दिवशीही ठिय्या
By admin | Published: October 04, 2016 12:07 AM