सांगली : माजी नगरसेवक दाद्या सावंत खून खटल्याच्या सुनावणीस सुरुवात झाली. बुधवारपासून सुरू झालेल्या सुनावणीत पहिल्या दिवशी वाहतूक पोलिसाची साक्ष पूर्ण करण्यात आली. पुढील सुनावणी १ ऑक्टोबरला होणार आहे. सावंत खून खटल्याची सुनावणी सुरू झाल्याने न्यायालय आवारात बुधवारी मोठी गर्दी झाली होती.
२ डिसेंबर २०१२ रोजी राम मंदिर ते शासकीय रुग्णालय रस्त्यावर माजी नगरसेवक दाद्या सावंत यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. व्ही. पोतदार यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी बुधवारी सुरू झाली. सरकार पक्षातर्फे विनायक देशपांडे तर बचाव पक्षातर्फे ॲड. जयसिंग पाटील ॲड. स्वप्नील पाटील यांनी काम पाहिले. पहिल्या दिवशी वाहतूक पोलीस सुदर्शन वाघमोडे यांची साक्ष झाली. माजी नगरसेवक राजू गवळी यांची साक्ष अपूर्ण राहिली असून ती आता १ ऑक्टोबरला होईल.
२०१२ मध्ये माजी नगरसेवक सावंत व गवळी हे दोघे महापालिकेतून बाहेर पडून एका कार्यक्रमासाठी जाणार होते. यावेळी कपडे बदलण्यासाठी म्हणून ते सावंत यांच्या घरी जात होते. राममंदिर चौक ते शासकीय रुग्णालय रस्त्यावरून ते जात असतानाच, पाठीमागून आलेल्या मोटारीतील संशयितांनी सावंत यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्यावर हत्यारानेही वार करण्यात आले. यावेळी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना मृत घोषित करण्यात आले होते.
याप्रकरणी सचिन जाधव ऊर्फ सच्या टारझन, सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या, अक्षय सपकाळ, शहाजी पवार, जितेंद्र दबडे, संतोष हत्तीकर, राकेश संकपाळ यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील जाधव यास न्यायालयाने निर्दाेष सोडले आहे तर सल्या चेप्या याचा मृत्यू झाला आहे. आता या खटल्याची पुढील सुनावणी १ ऑक्टोबर रोजी होणार आहे.