सांगली : भारतीय जैन संघटना, दक्षिण भारत जैनसभा, शांती विद्या ज्ञानवर्धन समिती, जैनाचार्य विद्यासागरजी सामाजिक प्रतिष्ठान आदींच्या वतीने सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राच्या रक्षणासाठी सोमवार, ९ जानेवारी रोजी सांगली मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी राजमती भवन येथे जैन समाजाची बैठक झाली.या बैठकीला दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, मुख्य महामंत्री अजित पाटील, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश पाटील, स्थानक वासी जैन समाजाचे अध्यक्ष अरुण शेठ, श्वेतांबर जैन समाजाचे अध्यक्ष सुभाष शहा, ट्रस्टी विजय शहा, जैनाचार्य विद्यासागरजी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहास पाटील, उपाध्यक्ष किरण सिदनाळे उपस्थित होते.सांगलीत ९ जानेवारी रोजी सकल जैन समाजाच्या वतीने सकाळी १० वाजता कर्मवीर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होईल. चिंतामणराव कॉलेजच्या क्रीडांगणावर मोर्चाचा समारोप होणार आहे. मुनीश्री चंद्रप्रभुसागर महाराज, मुनिश्री नियमसागर महाराज हेही मोर्चात सहभागी होणार आहेत.सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र हे पर्यटन क्षेत्र जाहीर केल्यामुळे तिची पवित्र्यता नष्ट होणार आहे. या पर्वतावर भाविक जात असताना अनवाणी पायाने जात असतात. झारखंड सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा. या मोर्चात ५० हजार जैन बांधव सहभागी होतील, असे भालचंद्र पाटील यांनी सांगितले.सुरेश पाटील यांनी सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राचे पवित्रता जपण्यासाठी सर्वांनी रस्त्यावर आलेच पाहिजे. गिरनार येथेही श्रावक-श्राविकांना त्रास देतात. पालीठाणा या तीर्थक्षेत्रामध्ये अनेक समाजकंटकांनी अतिक्रमण करून त्याचीही पवित्रता नष्ट करण्याचे काम सुरू केले आहे. त्याच्या विरोधात सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे. यावेळी स्वरूपा पाटील-यड्रावकर, विजय शहा, अरुण शेठ, सुभाष शहा उपस्थित होते. स्वप्नील शहा यांनी आभार मानले.
सांगलीत येत्या सोमवारी जैन समाजाचा मूकमोर्चा, सम्मेद शिखरजीचे पावित्र्य कायम राखण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 3:34 PM