सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यासाठी सहकारी व सेवाभावी संस्थांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर चारा छावणी सुरू करण्याबाबत सहकारी, स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे व्यासपीठावर उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सन 2018-19 मध्ये जिल्ह्यातील 5 तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या दुष्काळी भागातील पशुधन वाचवणे गरजेचे आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना आवश्यकतेनुसार जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णयानुसार चारा छावण्या सुरू करावयाच्या आहेत.
तरी चारा टंचाईमुळे चारा छावण्या उघडण्याची आवश्यकता असलेल्या ठिकाणी सहकारी साखर कारखाने, सहकारी खरेदी विक्री संघ, कृषि उत्पन्न बाजार समिती, दूध खरेदी विक्री संघ यासारख्या संस्थांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, चारा छावण्या सुरू करण्यासाठी संस्थेच्या भागभांडवलाची मर्यादाही कमी करून 5 लाखापर्यंत करण्यात आली आहे. तसेच, आयकराची अटही शिथिल केलेली असून संस्थांनी ऑडिट रिपोर्ट जोडण्यात यावा.
तरतुदींचे पालन करणाऱ्या चारा छावण्या चालक संस्थांना प्रतिदिन प्रति मोठे जनावर 90 रुपये आणि लहान जनावरांना 45 रुपये अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. मात्र, संस्थांनीशासन निर्णयातील तरतुदींप्रमाणे छावण्यांचे अभिलेख काटेकोरपणे व्यवस्थित ठेवावेत, जेणेकरून देयक अदा करताना अडचणी येणार नाहीत. हे एक सामाजिक कार्य मानून नकारात्मक मानसिकता दूर ठेवावी. सहकारी व स्वयंसेवी संस्थांनी चारा छावणीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे ते म्हणाले.यावेळी दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणासाठी मदतीच्या ठरणाऱ्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही आढावा घेण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी इच्छुक संस्थांनी ज्या ठिकाणी काम करावयाचे आहे, त्या ठिकाणांचा शोध घेऊन, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी सादर करावी.
यासाठी शासन स्तरावरून डिझेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा स्तरावर संपर्क साधावा, जेणेकरून त्रृटी दूर होऊन समन्वय साधण्यास मदत होईल. यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून, स्वयंसेवी संस्थांबरोबरच नागरिकांनीही यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. तसेच, कार्पोरेट कंपन्यांनी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून द्यावा. त्यांनी अनुलोम किंवा भारतीय जैन संघटना यासारख्या या कामातील अनुभवी स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने काम करावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी महापौर सुरेश पाटील, अनुलोमचे जिल्हा समन्वयक श्रीनिवास गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या प्रतिनिधींनी आपल्या सूचनावजा अनुभव व्यक्त केले.
जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दुष्काळग्रस्त भागात जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्यासाठी असलेल्या अटी व शर्तींची माहिती दिली. उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांनी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेसाठी लोकसहभाग महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.या बैठकीस अनुलोम, भारतीय जैन संघटना, साखर कारखाने, सहकारी दुध खरेदी विक्री संघ, सहकारी खरेदी विक्री संघ, कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.