सांगली : भलं मोठं बसकं नाक... कसलं देखणेपण नाही, पण भल्या-भल्यांच्या अंगावर सर्रकन काटा आणायला लावणाऱ्या यमुनाबाई वाईकर... म्हणजे बैठकीच्या लावणीच्या सम्राज्ञीनं दिलखेचक अदाकारीने शांतिनिकेतन लोकविद्यापीठामध्ये बैठकीच्या लावण्या सादर करुन जो माहोल तयार केला होता, तो आज त्या गेल्यानंतरही जसाच्या तसा डोळ्यासमोर आहे, अशी भावना शांतिनिकेतनचे संचालक गौतम पाटील यांनी व्यक्त केली.
१ मे १९९७... शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्यावतीने पहिल्यांदाच नाट्यपर्व हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्यासह सा. रे. पाटील, अमोल पालेकर, चित्रा पालेकर, दिलीप जगताप, अरुण पाटील, राहुल सोलापूरकर, चंद्रकांत कुलकर्णी अशी एकापेक्षा एक दिग्गज माणसं या कार्यक्रमासाठी उपस्थित होती. पण खरं आकर्षण होतं त्या यमुनाबाई वाईकर. त्या आदल्या दिवशीच शांतिनिकेतनला आल्या होत्या.
तेव्हा त्यांचं वय होतं ८२. चापूनचोपून नेसलेलं लुगडं... करारी नजर... बघताक्षणीच अदब वाटावी, अशा यमुनाबार्इंना बैठकीच्या लावण्या सादर कराव्यात, असा आग्रह आम्ही धरला. बैठकीच्या लावण्याच म्हणायच्या आणि त्या पण आजपर्यंत कुठेही न म्हटलेल्या, असा मान्यवरांचा आग्रह होता. काही तरी वेगळं सादर करायला मिळणार, म्हणून यमुनाबार्इंनाही आनंद झाला होता.
कलाविश्व महाविद्यालयाच्या हॉलमध्ये मग यमुनाबार्इंनी बैठकीच्या लावण्या म्हणायला सुरुवात केली. रात्री ९ वाजता लावण्यांना सुरुवात झाली. मान्यवरही लावणीचे अभ्यासक. एकापेक्षा एक फर्माईश होत होती आणि त्यावर यमुनाबार्इंची जबरदस्त अदाकारी अनुभवायला मिळत होती. पहाटे ३ वाजेपर्यंत ही मैफल सुरु होती. आज इतक्या वर्षांनंतरही ती मैफल आणि यमुनाबार्इंची ती अदाकारी तशीच मनात ताजी आहे. त्यानंतर दुसºया दिवशी नाट्यपर्वचा प्रारंभ झाला. यावेळीही त्या उपस्थित होत्या. ‘लावणीसम्राज्ञी’ हा पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने त्यांचा ५१ हजार रुपये प्रदान करुन सत्कार करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतरही त्यांनी काही लावण्या सादर केल्या होत्या.
परिवारातील ज्येष्ठ सदस्या गेली...प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्याशी त्या लावणी आणि लावणी सादर करणाºया कलाकारांबाबत नेहमी चर्चा करीत असत. आज यमुनाबाई यांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर, एक खूप मोठ्या लावणी कलाकार गेल्याचे दु:ख तर झालेच, परंतु त्याहीपेक्षा जास्त दु:ख शांतिनिकेतन परिवारातील एक ज्येष्ठ सदस्या गेल्याचे झाले असल्याची भावना गौतम पाटील यांनी व्यक्त केली.