सांगली : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते. दारिद्य्राशी झुंजणारे कुटुंब, वडापचे वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणारे वडील अशा वातावरणातून आलेल्या मुलाने जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकाविले.दुष्काळी उमदी (ता. जत) येथील वडाप चालकाचा मुलगा निखिल नागप्पा कोळी याने तामिळनाडू येथे खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात ९३ किलो व क्लीन अँड जर्क या प्रकारात ११९ किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले.निखिल सध्या सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्यामंदिर हायस्कूलमध्ये बारावीत शिकत आहे. उमदी येथील क्रीडा प्रशिक्षक संजय नांदणीकर यांनी वेटलिफ्टिंगचे त्याला प्रशिक्षण दिले. निखिल याने संभाजीनगर येथील राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याने अरुणाचल प्रदेश येथील राष्ट्रीय युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत त्याची निवड झाली होती. तेथील कामगिरीच्या जोरावर तो तामिळनाडू येथे खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी झाला होता. राष्ट्रीय स्तरावरही त्याने यशाची कहाणी नोंदविली.निखिलची परिस्थिती बेताची आहे. वडापचालक म्हणून काम करीत वडिलांना कुटुंबाचा भार उचलावा लागत आहे. मात्र, जबाबदारीचा भार उचलत निखिलने भारोत्तलनात चमक दाखवून वडिलांच्या कष्टाला यशाचे कोंदण लावले. निखिलला सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव एस.के. होर्तीकर यांनी मोठे पाठबळ दिले. देशपातळीवर यशाचा झेंडा रोवण्याची निखिलमधील क्षमता ओळखून होर्तीकरांनी त्याला प्रोत्साहन दिले. स्पर्धेत सहभागी व्हायचे म्हटल्यावरही पैशाचा भार पडतो. हा भार पेलण्याचे काम शिक्षण संस्थेने केली.निखिलचे प्रशिक्षक असलेले संजय नांदणीकर यांनीही त्याची जिद्द व प्रामाणिकपणा ओळखला होता. पहाटे कितीही वाजता सरावाला येण्याची त्याची तयारी, अनेक तास सराव करण्याची मानसिकता त्याच्यात होती. नांदणीकरांना त्याच्यातील हा गुण भावला. राष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडू घडविणाऱ्या नांदणीकरांनी निखिलची जबाबदारीही स्वीकारली. त्यांनीही तेवढीच जिद्द दाखवित त्याला यशापर्यंत पोहोचविण्यास मदत केली.
निखिलने यशासाठी खूप कष्ट घेतले आहेत. एवढ्या यशावर न थांबता पुढील एशियन गेम्सकरिता आम्ही तयारी करणार आहोत. देशाचे नाव मोठे करण्याची क्षमता निखिलमध्ये आहे.- संजय नांदणीकर, प्रशिक्षक, उमदी (ता. जत)