सांगली : भाजपचे जनमत घसरत चालले असून, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त २२५ जागाच मिळतील. काँग्रेसच्या जागांत सुधारणा होऊन १२५ पर्यंत त्यांचा आकडा जाईल, तर बिगर भाजप आणि काँग्रेस वगळून तिसºया आघाडीला सर्वाधिक १९३ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका शरद पवार बजावतील, असे वक्तव्य ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सांगलीत केले.
येथील मराठा सेवा संघाच्या सभागृहात भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘सांस्कृतिक दहशतवाद आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर वागळे बोलत होते.वागळे म्हणाले, देशाच्या राजकारणात खूप मोठे बदल झाले आहेत. राजकारणातील हवा बदलत असल्याची जाणीव झाल्याने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तिसºया आघाडीची तयारी सुरु केली आहे. भाजपला रोखण्यासाठी पवार यांची भूमिकाच निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव कमी होत असून, दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. देशभरात बेरोजगारी वाढण्याची भीती आहे.
वागळे पुढे म्हणाले की, मागील सरकारने केलेल्या चुका सुधारण्यासाठी भाजपला संधी दिली, पण त्यांच्याकडूनही लोकांचा अपेक्षाभंग झाला. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाची किमया झाली असल्याचा बोलबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरु आहे. तलाव खोदले, पण पाणी थांबत नाही.
८० वर्षांच्या धर्मा पाटील यांना मंत्रालयात येऊन जमिनीच्या मोबदल्यासाठी विषारी औषध प्राशन करावे लागत असल्याची बाब लज्जास्पद आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मार्क्सवादी पक्षाच्या राज्य अधिवेशन स्वागत समितीचे स्वागताध्यक्ष प्राचार्य भाई व्ही. वाय. पाटील, सचिव कॉ. उमेश देशमुख, डॉ. अमोल पवार, डॉ. नामदेव कस्तुरे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संजय देसाई, डॉ. संजय पाटील, आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती छायाताई खरमाटे, भारत मुक्ती मोर्चा महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा संगीता शिंदे आदी उपस्थित होते.भाजपचे कॉँग्रेसीकरणमागील सरकारने केलेल्या चुका सुधारण्यासाठी भाजपला संधी दिली. त्यांच्याकडूनही लोकांचा अपेक्षाभंग झाला. भाजपचेही कॉँग्रेसीकरण झाले आहे. राज्याच्या विविध भागात गेल्यानंतर पूर्वी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीत असलेले नेतेच भाजपमध्ये आलेले दिसून येत आहेत. त्यामुळे चार वर्षानंतर भाजप सरकार अच्छे दिन न आणणारे सरकार असल्याचे लोकांच्या लक्षात आल्याची टीका ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केली.