संतोष भिसेसांगली : कालबाह्य झालेली ९ हजार ५०० इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे जिल्हा प्रशासनाने सोमवारी परत पाठविली. दहा एसटी गाड्यांमधून ती तिरुपतीला रवाना केली. त्यासोबत महसूल विभागाचे अधिकारी व मोठा पोलीस बंदोबस्त होता.संपूर्ण जिल्हाभरातून मतदान यंत्रे एकत्रित करुन मिरजेत वैरण बाजारातील शासकीय गोदामात ठेवली होती. ती पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार मिरजेचे तहसीलदार रणजित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही झाली. सकाळी महामंडळाच्या दहा गाड्या गोदामात दाखल झाल्या. त्यामध्ये ९२२ पेट्या चढविण्यात आल्या. त्यात एकूण ९ हजार ५०० यंत्रे होती. गाड्यांसोबत एक तहसीलदार, दोन नायब तहसीलदार, दोघे लिपिक व पोलीस बंदोबस्त होता.२०१४ पर्यंतच्या विधानसभा, लोकसभेसह विविध निवडणुकांत या यंत्रांचा वापर झाला होता. २०१९ च्या निवडणुकीत नव्या मॉडेलची यंत्रे जिल्हा प्रशासनाला मिळाली. त्यामुळे ही यंत्रे कालबाह्य ठरल्याने गोदामात पडून होती.जुन्या यंत्रांत बॅटरी कमी क्षमतेची होती. शिवाय मतदानाची क्षमताही १२८ इतकीच होती. नव्या यंत्रात २०० हून अधिक मतदान शक्य होते. जुनी यंत्रे तिरुपतीमधील कंपनीत उत्पादित केली होती. ती पुन्हा त्यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यात मतदानविषयक काहीही माहिती नाही.एसटीला मिळाले सहा लाखांचे उत्पन्नजुनी यंत्रे तिरुपतीला पाठविण्यासाठी प्रशासनाने एसटी महामंडळाच्या मालवाहू बसेस भाड्याने घेतल्या. त्यामुळे एसटीच्या मिरज आगाराला सहा लाखांचे उत्पन्न मिळाले.
ही मतदान यंत्रे एम १ मॉडेलची जुन्या बनावटीची होती. ती कालबाह्य झाल्याने तिरुपतीला संबंधित कंपनीकडे पाठविण्यात आली.- रणजित देसाई, तहसीलदार, मिरज
मतदानविषयक माहिती काढून घेतलीसध्या वापरात असणारी ईव्हीएम उच्च दर्जाची आहेत. त्यांचा वापर यशस्वी ठरल्यानंतर जुनी यंत्रे प्रशासनाकडून कालबाह्य ठरविण्यात आली. त्याच्यातील मतदानविषयक माहिती काढून घेण्यात आली आली, मात्र संवेदनशीलता पाहता तिरुपतीला पाठविताना कडक बंदोबस्तात देण्यात आला.