मिरज : मिरज पूर्व भागात वन्यप्राण्यांची बेकायदा शिकार करणाऱ्या जयसिंगपूर परिसरातील नऊजणांना मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून शिकार केलेले ससे, पक्षी, तसेच छऱ्याची बंदूक, एक स्कूल व्हॅन, सुमो असा १८ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला. दरम्यान, बंदूक घेऊन फिरणाऱ्या अनोळखी टोळक्यामुळे टाकळी परिसरात अतिरेकी आल्याची अफवा पसरली होती. जयसिंगपूर येथील नऊजण मंगळवारी रात्रभर दोन वाहनांतून जानराववाडी परिसरात बंदूक घेऊन फिरत होते. याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक राजू मोरे, सहाय्यक निरीक्षक भारत शिंदे यांच्यासह पोलिस पथकाने नाकेबंदी करून टाकळी, मल्लेवाडी रस्त्यावर वाहने अडवून सुमो (क्र. एमएच १० बीए ८११५) व स्कूल व्हॅन (क्र. एमएच १० के ९१५८) त्यातील नऊजणांसह ताब्यात घेतली. त्यांच्याकडे परदेशी बनावटीची छऱ्याची बंदूक, शिकार केलेले ससा, तितर, होले हे मृत पक्षी सापडले. बेकायदा शिकारीप्रकरणी पोलिसांनी उमर फारूख पठाण (वय ३२, रा. जयसिंगपूर), असिम फारूख पठाण (३२, रा. उदगाव), असिम शहाबुद्दीन मुजावर (४८, रा. जयसिंगपूर), असिफ हासिम नंदगावे (३२, रा. उदगाव), संदीप आनंदा शिंगाडे (३०, रा. जयसिंगपूर), शेरअली इसाक शहापुरे (३२, रा. जयसिंगपूर), शफीक अब्दुलरहीम शेख (३८,रा. जयसिंगपूर), अब्दुल शकुर तहसीलदार (३१, रा. कोल्हापूर), जावेद रझाक मुजावर (३२, रा. बिसूर) यांना अटक केली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून, शिकार केलेले प्राणी वन्यजीवच असल्याची खात्री करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी चौकशी केली. (वार्ताहर)छऱ्याची बंदूकसंशयितांना ताब्यात घेतल्यानंतर, अतिरेकी व शस्त्रसाठा पकडल्याच्या अफवा परिसरात पसरल्या होत्या. मात्र पोलिसांच्या चौकशीत हे सर्वजण शिकारीसाठी छऱ्याची बंदूक घेऊन आल्याचे निष्पन्न झाले.
मल्लेवाडीत नऊ शिकाऱ्यांना अटक
By admin | Published: October 13, 2016 2:30 AM