पलूस : सावंतपूर वसाहत (ता. पलूस) येथील एकास जादा पैशाच्या परताव्याचे आमिष दाखवून नऊ लाख ६६ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याबाबत पलूस पोलिस ठाण्यात गजानन अशोक मिरजे यांनी फिर्याद दिली आहे.गजानन मिरजे यांना एका अनोळखी व्यक्तीचा मोबाइल फोन आला. फोनवरून संबंधित भामट्याने, आपली व्हाइट एफएक्स युके नावाची कंपनी असून, या कंपनीत ५०० डॉलर्सची गुंतवणूक केल्यास दिवसाला दोन ते तीन हजार रुपये परतावा मिळतो, असे सांगितले. यानंतर व्हाॅटस्ॲपवर कंपनीचा मुंबईतील बांद्रा येथील पत्ता पाठवला. यावर मिरजे यांनी विश्वास ठेवला आणि पैसे पाठविण्याचे कबूल केले.संबंधिताने कर्नाटक बँक, कॅनरा बँक व आयडीबीआय बँक येथील खाते क्रमांक मिरजे यांना पाठविले. त्यानंतर दि. २५ ऑक्टोबर २०२२ ते दि. १३ जानेवारी २०२३ या कालावधीत मिरजे यांनी या तिन्ही बँक खात्यांवर नऊ लाख ६६ हजार रुपये पाठविले. मात्र, परताव्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना भामट्याने कोणतीही दाद दिली नाही.
यामुळे फसवणूक झाल्याने मिरजे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मंगळवार, दि. २१ रोजी पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पलूसचे पोलिस अधिक तपास करत आहेत.