सांगली : मिरजेतील हॉटेल नूरजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून नऊ लाख रुपये किमतीचे हस्तिदंत जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी सुहेल अल्ताफ मेहत्तर (वय ३१, रा. चिंचणी रोड, तासगाव) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक मिरज शहरात गुरुवारी पेट्रोलिंग करीत होते. पथकातील पोलीस कर्मचारी बिरोबा नरळे यांना मिरजेतील नूर हॉटेलजवळील मोकळ्या जागेत मोटारसायकलवरून एकजण हस्तिदंत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने नूर हॉटेलजवळील मोकळ्या जागेत छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना सुहेल मेहत्तर मोटारसायकलसह आढळला. पथकाने त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात एक हस्तिदंताचा तुकडा मिळाला. त्याच्या मोटारसायकलची डिकी तपासली असता, एका पिशवीत लहान-मोठे असे तीन हस्तिदंत मिळून आले. पोलिसांनी हस्तिदंताबाबत चौकशी केली असता, मेहत्तर याने समाधानकारक उत्तर दिले नाही.
या हस्तिदंताची किमत ८ लाख ७८ हजार इतकी आहे. हस्तिदंतासह मोटारसायकल व मोबाईल असा एकूण ९ लाख ३४ हजार रुपयांचा मद्देमाल पथकाने जप्त केला. मेहत्तर याच्याविरूद्ध मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, हवालदार नीलेश कदम, बिरोबा नरळे, संदीप पाटील, चेतन महाजन, सागर टिंगरे, वनरक्षक राजेंद्र पाटील यांनी पार पाडली.