प्रताप महाडिक -- कडेगाव -अभ्यासात कच्चा आहे, गुण कमी मिळवतो, दहावीत पास होणार नाही, अशा मुलांना नववीत नापास करून दहावीचा निकाल उंचावण्याची प्रथा कडेगाव तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये सुरू आहे. या प्रकारच्या शाळांवर शासनाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. नववीचा निकाल कमी लागणाऱ्या शाळांना शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत. नववीत नापास होऊन शाळा सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यामुळे शासनाने कारवाईचे पाऊल उचलले आहे.अनेक शाळांमध्ये आठवी आणि नववीच्या दोन तुकड्या आहेत. परंतु दहावीची मात्र एकच तुकडी आहे. म्हणजे एका तुकडीइतके विद्यार्थी नववीत नापास केले जातात. शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अशा शाळांच्या मागील २ वर्षाचा अहवाल मागविला आहे. संपूर्ण तुकडीच नापास करणाऱ्या शाळांची मान्यता काढण्याचेही संकेत शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. यापुढे नववीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी लक्षात घेऊन दहावीच्या निकालाची टक्केवारी निश्चितच करून त्या शाळेची गुणवत्ता धरली जाणार आहे. यामुळे निकाल उंचावल्याचा आव आणणाऱ्या शाळांचे पितळ उघडे पडणार आहे. इतर मुलांच्या तुलनेने हुशार नसलेल्या मुलांना दहावी, बारावीची परीक्षा देण्याची संधी तरी मिळाली पाहिजे. निकाल कमी लागल्यामुळे संस्थापक, मुख्याध्यापक, विषय शिक्षकांवर कारवाई किंवा बदली करतात. याचा फटका नववी तसेच अकरावीच्या मुलांना बसत आहे. शासनाने नववीप्रमाणे अकरावीत विद्यार्थ्यांना नापास करणाऱ्या शाळांनाही कारणे दाखवा नोटिसा पाठवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.शाबासकीसाठी : विद्यार्थ्यांचे नुकसाननववीचा निकाल कमी करून दहावीचा निकाल जवळपास शंभर टक्के लावायचा आणि संस्थाचालक व पालकांकडून शाबासकी मिळवायची, असे प्रकार शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षक करत आहेत. येथे शंभर टक्के निकालासाठी प्रयत्न होतो, परंतु दर्जेदार शिक्षण मात्र मिळत नाही.
दहावीच्या गुणवत्तेसाठी ‘नववी नापास’चा फंडा
By admin | Published: April 08, 2016 11:36 PM