घनशाम नवाथेसांगली : लालपरीच्या तब्बल ७२ वर्षांच्या इतिहासात कोणत्याही महिलेने ‘स्टेअरिंग’ हाती घेतले नव्हते. परंतु, दीड वर्षापूर्वी त्यांच्या हाती ‘स्टेअरिंग’ आले. आता त्या नऊ जणी सांगली-मिरजेतील वर्दळीच्या रस्त्यांवर आणि आसपासच्या गावांत सहजपणे लालपरी चालविताना दिसतात. महिलेच्या हातातील ‘स्टेअरिंग’ पाहून बसमधून प्रवास करणाऱ्या कॉलेज तरुणींनादेखील प्रेरणा मिळत आहे.
एसटीमध्ये महिला वाहक जवळपास २० वर्षांपूर्वी दाखल झाल्या. महिला वाहक तिकीट-तिकीट म्हणून पुकारताना पाहून अनेकांना सुरुवातीला नवल वाटायचे. परंतु, हे नवल जेव्हा ‘ती’च्या हाती लालपरीचे ‘स्टेअरिंग’ आले तेव्हा संपले. ‘ती’च्या हाती जेव्हा स्टेअरिंग देण्याचा निर्णय झाला, तेव्हा अनेक प्रवाशांना आश्चर्य वाटले. काहींनी भीतीदेखील व्यक्त केली. परंतु, ‘ती’ने भीती व्यर्थ असल्याचे सिद्ध करून दाखवले.एसटीमध्ये नवीन भरती आता ‘चालक कम वाहक’ अशा पद्धतीची असते. चारचाकी वाहन चालविण्याचा परवानाही आवश्यक ठरतो. दोन वर्षांपूर्वी नव्या भरतीतून ‘ती’च्या हाती लालपरीचे स्टेअरिंग देण्याचा निर्णय झाला. सांगलीत ‘चालक कम वाहक’ अशा त्या दाखल झाल्या. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या सज्ज झाल्या. सीमा सचिन लोहार ही सांगलीतील पहिली महिला एसटी चालक म्हणून दरवाजा उघडून स्टेअरिंग चालवू लागली. तिने सफाईदारपणे एसटी बस चालवून प्रवाशांना विश्वास दिला.
सध्या सांगली आगारात तिघी आणि मिरज आगारात सहा जणी लालपरी चालवताना दिसतात. सांगली-मिरजेतील रहदारीचा रस्ता असो की सांगली, मिरजेजवळील खाचखळग्यातील गावे असोत, त्या नऊजणी सफाईदारपणे एसटी बस चालवतात. त्यांना पाहून प्रवाशांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. सध्या सर्वत्र वाहनांची गर्दी वाढली आहे. या गर्दीतून दुचाकी, चारचाकी वाहन चालवताना अनेकांना कसरत करावी लागते. परंतु, याच रस्त्यावरून १५ ते २० फूट लांबीची बस त्या नऊ जणी कौशल्यपूर्ण चालविताना दिसतात.
या नऊ जणींच्या हातात स्टेअरिंगसीमा सचिन लोहार, शारदा महानंद मदने, सुवर्णा भगवान आंबवडे या तिघी सांगली आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत. तर कविता मुकुंद पवार, नसीमा खलीफा तडवी, अंजुम मैनुद्दीन पिरजादे, मीनाताई भीमराव व्हनमाने, ज्योती भोसले, स्मिता प्रल्हाद मदाळे या सहा जणी मिरज आगारात कार्यरत आहेत.
विना अपघात सेवा..महिला चालक सुरक्षित वाहन चालवतील काय? याची काळजी एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना होती. परंतु, गेल्या दीड वर्षात विना अपघात कर्तव्य बजावून या नऊ जणींनी लक्ष वेधले आहे. केवळ शहरातच नव्हेतर, सांगलीतून इचलकरंजी, कोल्हापूर तसेच मिरजेतून कुरूंदवाड मार्गावरही ‘ती’ सहजपणे लालपरीतून प्रवाशांना सुरक्षित ने-आण करते. या महिला चालक कौतुकास्पद ड्रायव्हिंग करताना दिसत आहेत.
चांगल्या सेवेबद्दल सन्मानमिरज आगारातील कविता पवार ही महिला चालक सलगपणे चालक म्हणून कर्तव्य बजावत आहे. तिच्या चांगल्या सेवेबद्दल दिल्लीतील कार्यक्रमात तिचा सन्मान केला जाणार आहे. त्यासाठी तिला निमंत्रण मिळाले असल्याचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी सांगितले.