सांगली : आपल्या आवडत्या प्राण्यांबद्दल लहान मुले किती हळवी असतात, याचा प्रत्येक अनेकदा येत असतो, मात्र हळवी झालेली ही मुले आता आपल्या भावना सार्वजनिक स्तरावर तितक्याच तत्परतेने व्यक्तही करीत आहेत. सांगलीतील एका नऊ वर्षीय बालिकेने हत्तीणीच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करणारे व त्यांच्या संरक्षणाची मागणी करणारे पत्र केरळच्या मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांची नात असलेल्या राजनंदिनी निखिल पाटीलने केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना पत्र लिहले आहे. वास्तविक केरळचे मुख्यमंत्री कोण, त्यांचा पत्ता काय आहे, याची कोणतीही कल्पना या मुलीला नव्हती. तिने पत्र तयार करून ते आजोबांच्या हाती दिले आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांना पाठवायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर सुरेश पाटील यांनी पत्रा शोधून तिचे हे पत्र पोस्ट केले.
केरळमधील पिलक्कड जिल्ह्यात गर्भवती हत्तीणीला स्फोटक खाल्यामुळे आपला जीव गमवावा लागला. या हत्तीणीची हत्या झाल्याची टीकाही होत आहे. देशभरातून याबाबतच्या तक्रारी व चौकशीची मागणी करणारी पत्रेही मुख्यमंत्र्यांच्या दालनात दाखल होत आहेत. या पत्रातील गर्दीत या चिमुकलीचे पत्र भावूक करणारे ठरले.राजनंदिनीने इंग्रजीत हे पत्र लिहले असून त्यात म्हटले आहे की, आपल्या राज्यात होणाऱ्या हत्तींच्या मृत्यूंचे प्रकार थांबवावेत. तुमच्याकडे आमच्याप्रमाणेच गणपती उत्सव साजरा केला जातो. गणपतीला हत्तीचे तोंड आहे. त्यामुळे हत्तीबद्दल आम्हाला खुप आदर वाटतो. त्यांचे दात काढून घेणे, त्यांना जखमी करणे तसेच मारण्याचे प्रकार घडल्यानंतर आम्हाला खुप दु:ख वाटते. कृपया त्यांचे संरक्षण तुम्ही करावे, अशी इच्छा आहे.हत्तीणीच्या मृत्यूचा या चिमुकलीच्या मनावर झालेला आघात पाहून राजनंदिनीच्या कुटुंबियांनाही आश्चर्य वाटले. लहान मुलांचे प्राणीप्रेम सर्वांनी अनुभवले असले तरी त्याच्या मृत्यूने ही मुले इतकी भावनिक होत असतील याची कल्पना त्यांना नव्हती. त्यांनी तिच्या भावनांचा आदर करीत केरळच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पत्र पोहच करण्यासाठी मदत केली आणि अखेर मुख्यमंत्र्यांकडे ते पोहचलेसुद्धा.