लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पक्षांतर्गत गटबाजी थांबविण्यासाठी सावध पावले टाकत भाजपने बुधवारी निरंजन आवटी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे गटबाजीचा धोका टळल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. काँग्रेसने फिरोज पठाण यांचे नाव निश्चित करून त्यांचा अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत दोन्हीकडून उमेदवारांची निश्चिती करण्यात आली. भाजपकडून निरंजन आवटी व सविता मदने ही दोन नावे आघाडीवर होती. आवटी यांना डावलल्यास काँग्रेस, राष्ट्रवादीस नाराजीचा फायदा होईल, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व भाजप नेत्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे मदने यांची समजूत घालत आवटी यांना संधी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील व सुरेश आवटी यांच्यात गुफ्तगू झाल्यामुळे त्यांचा गट फुटण्याची चर्चा सुरू झाली होती.
महापौर, उपमहापौर निवडीत बसलेला फटका स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत टाळण्यासाठी भाजपने हुशारीने पावले टाकली. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी शक्यता मावळली आहे. काँग्रेसने पद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपमधील नाराजीचा फायदा मिळेल, अशी आशा त्यांना अद्याप आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापतिपदाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसने सभापतिपदासाठी भाजपच्या तीन नगरसेवकांना फाेडण्याची तयारी केली होती. याची कुणकुण लागताच भाजपने सर्व नऊ सदस्यांना हैदराबाद सहलीवर पाठविले. त्यामुळे काँग्रेसच्या फोडाफोडीच्या प्रयत्नाला ब्रेक लागला.
चौकट
असे आहे पक्षीय बलाबल
स्थायी समितीत भाजपचे ९, काँग्रेस ४, तर राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी यांची गोळाबेरीज केल्यास संख्याबळ सात होते. सभापतिपदासाठी त्यांना किमान आणखी दोन सदस्यांचे पाठबळ हवे आहे. भाजपमधील सदस्य फुटण्याची शक्यता आता जवळपास मावळली आहे.
चौकट
मदने यांची समजूत
भाजपच्या सविता मदने यांचे नाव सभापतिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते, मात्र नाराजी टाळण्यासाठी आवटींचे नाव भाजपकडून निश्चित करण्यात आले. दुसरीकडे मदने यांची नाराजी नको म्हणून त्यांना भविष्यात चांगले पद देण्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना आश्वासन दिल्याचे समजते.