विटा : पर्यावरण, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून पर्यावरणाची लोकचळवळ उभी करणाऱ्या वसुंधरा पर्यावरण संस्थेच्या अध्यक्षपदी नितीन बाबूराव चंदनशिवे (लेंगरे) यांची, तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.
वसुंधरा पर्यावरण संस्थेने सन २०१६ पासून सलग चार वर्षे पर्यावरण, सामाजिक, शैक्षणिक, तसेच स्वच्छ भारत अभियानात उत्कृष्ट काम केले आहे. यापूर्वी दत्तात्रय शिंदे यांनी अध्यक्षपदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली होती. संस्थेने आतापर्यंत केलेल्या विविध कामाची दखल घेऊन संस्थेला राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
खानापूर येथे वसुंधरा पर्यावरण संस्थेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत नितीन चंदनशिवे यांची अध्यक्षपदी, तर मावळते अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी उपाध्यक्षपदी निवड करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यामुळे या निवडी एकमताने जाहीर करण्यात आल्या. आगामी काळात संस्थेला राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी योगदान देणार असून, यापुढे संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम घेऊन समाजाप्रती कृतज्ञता व पर्यावरण संवर्धनाचे कर्तव्य पार पाडून युवा वर्गाला संघटित करीत पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय करणार असल्याची ग्वाही यावेळी नूतन अध्यक्ष नितीन चंदनशिवे यांनी दिली.
यावेळी सचिव कोमल हसबे, खजिनदार भगवान जाधव, डॉ. वैशाली हजारे, गणेश धेंडे, नानासाहेब मंडलिक, प्रा. डॉ. बाळासाहेब कर्पे, शीतलकुमार जाधव, अस्लम शेख, प्रतीक्षा जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो - २६१२२०२०-विटा-नितीन चंदनशिवे. यांचा फोटो वापरणे.