सांगली : संचारबंदीत नियम मोडून व्यावसाय करणाऱ्या सात दुकानांवर महापालिकेने कारवाई करत ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला तसेच मार्केट यार्डात मंगळवारी नागरिकांची गर्दी नियंत्रित करण्यात अपयश आल्याबद्दल सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीला महापालिकेने नोटीस बजावली.
लॉकडाऊनकाळात काही दुकानांना सकाळी ७ ते ११ या वेळेत व्यावसाय करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर दुकाने सुरू ठेवल्यास कारवाई करण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या पथकाने कारवाई केली. मंगळवारी विश्रामबाग आणि मार्केट यार्डात अनेक दुकाने ११ नंतरही सुरू होती. त्यामुळे रोकडे यांनी प्रभाग समिती २ च्या कार्यक्षेत्रात पथकासह फिरून सात दुकानांवर कारवाई केली. त्यातून ४५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
विश्रामबाग पोलिसांच्या मदतीने महापालिकेने शहरात कारवाई केली आहे. याचबरोबर मार्केट यार्डात ११ नंतरसुद्धा व्यापारीपेठा सुरू राहिल्याने आणि गर्दीला कारणीभूत ठरल्याबद्दल मार्केट कमिटीला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही उपायुक्त रोकडे यांनी दिला आहे. या कारवाईत सहायक आयुक्त एस. एस. खरात, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी, पंकज गोंधळे, प्रमोद कांबळे, प्रमोद रजपूत, चंदू जाधव यांच्यासह विश्रामबाग पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकबर हवालदार, सतीश वगरे यांच्यासह पोलीस पथक सहभागी झाले होते.