सांगली : कोरोनाच्या काळातही महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी मार्चअखेर ४४ कोटी ७९ लाख ८९ हजार ६२८ रुपयांची घरपट्टी कर जमा केला आहे, तर अभय योजनेचा ४७ हजार मालमत्ताधारकांनी लाभ घेतला असून, त्यांचा साडेसहा कोटींचा दंड व शास्ती माफ करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी आकारणी करण्यात येणाऱ्या उपयोग कर्ता कराची ७ कोटी ५६ लाख रुपयांची वसुली झाली आहे. घरपट्टी विभागाने यंदा एकूण ५२ कोटीची वसुली केली आहे.
महापूर व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची कर वसुली गेली दोन वर्ष घटली आहे. यंदा कोरोनामुळे करवसुलीवर परिणाम होण्याची शक्यता होती. घरपट्टी विभागाची थकबाकी ४८ कोटी ७२ लाख, तर चालू मागणी ४२ कोटी १५ लाख अशी ९० कोटी ८८ लाख होती. यापैकी ४४ कोटी ७९ लाख ८९ हजार ६२८ रुपयांची वसुली झाली. यात १७ कोटी ३ लाख २० हजार थकबाकी, तर २७ कोटी ७६ लाख ६९ हजार ४४७ रुपये चालू मागणीतील वसुलीचा समावेश आहे. उपयोगकर्ता करापोटी सात कोटी ५६ लाख ४९ हजार ६०१ रुपये वसूल झाले आहेत.
चौकट
दीड महिन्यात २३ कोटी वसूल
कोरोनामुळे घरपट्टीच्या वसुलीला ब्रेक लागला होता. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कर वसुलीला सुरूवात झाली. त्यात १५ फेब्रुवारीपासून थकबाकीदारांसाठी दंड व शास्ती माफीची अभय योजना जाहीर करण्यात आली. या दीड महिन्यात महापालिकेने २३ कोटी रुपयांची वसुली केली.
चौकट
मार्चअखेर वसुली
तपशिल घरपट्टी उपयोग कर्ता कर
थकबाकी १७.०३ कोटी ३.०२ कोटी
चालू मागणी २७.७६ कोटी ४.५४ कोटी
एकूण ४४.७९ कोटी ७.५६ कोटी