सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बड्या थकबाकीदारांना कर्ज माफी दिली जात आहे. तसेच थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर बँकेकडून जप्तीची कारवाई होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सांगलीत जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर सोमवारी शखध्वनी आंदोलन करून प्रवेशद्वारात ठिय्या मारला. बँक प्रशासनाच्या भूमिकेबद्दल शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या.जिल्हा बँकेच्या प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले की, जिल्ह्यातील खासदार, आजी-माजी आमदार आणि पुढाऱ्यांची कोट्यवधींची कर्जे थकीत आहेत. जिल्ह्यातील साखर कारखाने आणि सूतगिरण्याची सुमारे एक हजार कोटीची थकीत कर्जे आहेत. अनेक कारखाने, सूतगिरण्या बंद आहेत, त्याच्यावर जप्तीची कारवाई होत नाही. त्यांना बँकेचे अधिकारी पायघड्या घालत आहेत. शेतकऱ्यांवर मात्र तातडीने जप्तीची कारवाई केली जाते, हे चालू देणार नाही. प्रथम बड्या नेत्यांची कर्जे वसूल करा, मग शेतकऱ्यांची थकबाकी वसूल करा, अशी मागणी केली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे म्हणाले, जिल्हा बँकेची हुकूमशाही पद्धतीने शेतकऱ्यांची कर्ज वसुली चालू आहे. या विरोधात आणखी तीव्र आवाज उठविण्यात येणार आहे. यावेळी संजय बेले, राजेंद्र पाटील, अजित हलिगले, भरत चौगुले, बाळासाहेब लिंबेकाई, गुलाब यादव, सुनील पाटील, मच्छिंद्र पाटील, सुधाकर पाटील, पीरगोंडा पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.
जिल्हा बँकेला टाळे ठोकणार : महेश खराडेजिल्हा बँकेच्या प्रशासनाने आदी बड्या थकबाकीदारांवर कारवाई केली पाहिजे. त्यानंतरच शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांविरोधातील जप्तीची कारवाई थांबविली नाही तर जिल्हा बँकेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.